Ruturaj Patil Net Worth : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा संधी मिळालेल्या ऋतुराज पाटील (Ruturaj Patil Net Worth) यांनी साधेपणाने गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, ऋतुराज पाटील यांनी दिलेल्या संपत्ती विवरणामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये 14 कोटी रुपयांची वाढ झाल्याची दिसून आले आहे. ऋतुराज पाटील यांची एकूण संपत्ती 48 कोटी 48 लाख 78 हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.


ऋतुराज पाटील यांची संपत्ती 


ऋतुराज पाटील (Ruturaj Patil Net Worth) यांची 25 कोटी 18 लाख 53 हजार 8 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. 23 कोटी 30 लाख 25 हजार 242 रुपये स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर दोन बँकांचे 26 कोटी 98 लाख 14 हजार 686 रुपयांचे कर्ज आहे. पाटील यांच्याकडे 4 कोटी 42 लाख 10 हजार 525 रुपये वारसाप्राप्त संपत्ती आहे. ऋतुराज पाटील यांच्या पत्नी पूजा यांच्या नावावर 67 लाख 62 हजार 706 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे.  2 कोटी 24 लाख 67 हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे. मुलगा अर्जुनच्या नावावर 1 कोटी 51 लाख 97 हजार 582 रुपयांची जंगम तर 2 कोटी 61 लाख 58 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दुसरा मुलगा आर्यमनच्या नावावर 1 कोटी 32 लाख 65 हजार 624 रुपयांची जंगम तर 92 लाख 68 हजार 800 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.


कोल्हापुरात दिग्गज उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल 


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातून 22 उमेदवारांनी 34 अर्ज दाखल केले आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांनी राधानगरी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वत:च्या शाहू आघाडीतर्फे अर्ज दाखल केला. कागलमधून शाहू समूहाचे प्रमुख समरजित घाटगे यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी आजचा मुहूर्त साधण्यासाठी साधेपणाने अर्ज दाखल केला. माजी आमदार अमल महाडिक यांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केला. शाहूवाडीमधून आमदार विनय कोरे यांनी शक्तिप्रदर्शन करत सभा घेतली. इचलकरंजीत राहुल आवाडे यांनी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. करवीर मतदारसंघातून राहुल पाटील आणि जनसुराज्यचे संताजी घोरपडे यांनी अर्ज दाखल केला. शाहूवाडीमधून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनीही अर्ज दाखल केला. तिसऱ्या दिवशी कोल्हापूर दक्षिणमध्ये सर्वाधिक तीन अपक्षांसह सर्वाधिक अर्ज दाखल झाले. 


इतर महत्वाच्या बातम्या