मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राजभवानावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम हे त्यांच्या पक्षातील सहकारी उपस्थित होते. राज्यपालांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.


तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. तेरावी विधानसभा ही 10 नोव्हेंबर 2014 रोजी अस्तित्त्वात आली होती. 9 नोव्हेंबर रोजी पाच वर्षे पूर्ण होत असल्याने विधानसभेचा कार्यकाळ हा संपुष्टात येणार आहे. घटनात्मक तरतुदीनुसार त्यापूर्वी नवं सरकार अस्तित्त्वात येणं आवश्यक आहे. सरकारचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही तासच शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरीत कालावधीत जर नवे सरकार अस्तित्वात आले नाही तर, घटनात्मक पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे एक तांत्रिक बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत 105 जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर, त्या खालोखाल शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मोठा पक्ष म्हणून सरकार बनवण्याची नैतिक जबाबदारी भाजपवर येते. विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना महायुतीत तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत लढले होते. संख्याबळाचा विचार करता भाजप-शिवसेनाने युतीचं सरकार स्थापन करायला हवं होतं. परंतु मुख्यमंत्रीपद आणि सत्तावाटपावरुन दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाल्यामुळे कोणीही राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही.

दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नाही. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचं मॅनडेट दिलं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या अस्थिर परिस्थिती निर्माण झाली असून, राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल झाली आहे. आज भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला नाही तर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.