Vasantrao Deshmukh Statement: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe-Patil) यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. सुजय विखे पाटलांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात काल (दि.25) सभेदरम्यान वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुजय विखे मंचावर उपस्थित असताना जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सभास्थळी ठिय्या मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वक्तव्याचा निषेध करण्यात आला, देशमुख यांच्या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे, यावर सुजय विखे पाटलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून याबाबतच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. 


सुप्रिया सुळेंची संतापजनक प्रतिक्रिया


वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. "संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपाचे नेते वसंत देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई थोरात यांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ विधान केले. भरसभेत आपल्या मुलीच्या वयाच्या नेत्यावर अशा पद्धतीने गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली,ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विशेष म्हणजे माजी खासदार सुजय विखे देखील या सभेला उपस्थित होते. त्यांनी देखील या विधानाचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. शिवरायांच्या ज्या राज्यात महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येत होती. त्या राज्यात महिलांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ भाषा वापरण्यात येत आहे. हे भाजपाचे संस्कार आहेत. या विधानाचा तीव्र निषेध. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो ही प्रार्थना".




राजकारण इतक्याही खालच्या पातळीवर जाऊ नये - अमोल मिटकरी


या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, काल संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री, बाळासाहेब थोरात यांच्या कन्येविषयी ज्या पद्धतीने देशमुख नावाचे वृद्ध गृहस्थ बरळले ते संताप जनक आहे. भाऊ म्हणुन आम्ही डॉ. जयश्री थोरात यांच्या पाठीशी खंबीर आहोत. राजकारण इतक्याही खालच्या पातळीवर जाऊ नये. #निषेध, अशी संतापजनक सोशल मिडिया पोस्ट केली आहे.




काय म्हणाले सुजय विखे पाटील?


महायुतीच्या मेळाव्यामध्ये वसंतराव देशमुख या गृहस्थांनी त्यांच्या भाषणामध्ये अतिशय आक्षेपार्ह भाषेत टीका केली, त्यांचे भाषण सुरू असताना मी त्यांना दोनदा थांबवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते थांबले नाहीत. मी तिथे असताना मला ते समजलं नाही, नंतर एकाने मला सांगितलं ते काय बोलले, मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्याआधी हा सर्व गोंधळ उडाला. महायुतीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचं त्या वक्तव्याशी संबध नाही, त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, जर अशा खालच्या पातळीवर किंवा पातळी सोडून वक्तव्ये करत असेल तर त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पक्षात ठेवलं जाणार नाही. त्याला महायुतीमध्ये ठेवलं जाणार नाही, असंही यावेळी सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे. 


वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. योग्य ती कारवाई त्यांच्यावर करावी, या वक्तव्यावर कलम लावून पोलिस प्रशासनाने यावर कारवाई करावी,त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या आणि जाळल्या त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी असंही विखे पाटलांंनी म्हटलं आहे. वक्तव्य झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या, फोडण्यात आल्या. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI