Viral: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, व्यायामासाठी वेळ न मिळणे किंवा ते टाळणे अशा गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. काही लोक कामात इतके गुंतून जातात की त्यांना त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो. सध्याच्या काळात प्रत्येकाला निरोगी राहायचे असते, परंतु कधीकधी वेळेअभावी, आर्थिक परिस्थितीमुळे किंवा आळशीपणामुळे लोक जिममध्ये जाऊ शकत नाही. मात्र आता अशी एक जिम, जी तुमच्या खोलीतच असेल, त्यासाठी फक्त एका कोपऱ्यात थोडी जागा हवी आहे. जाणून घ्या या अनोख्या जिमबद्दल...


आयआयटीच्या चार पदवीधर विद्यार्थ्यांची कमाल


आयआयटी दिल्लीच्या चार पदवीधर विद्यार्थ्यांनी एका खोलीत बसणारी जीम तयार केली आहे. त्याला त्यांनी Aroleap X असे नाव दिले आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी स्वतः त्याचा व्हिडीओ शेअर केला आणि चार अभियंत्यांचे कौतुक केले. त्यांनी लिहिले की ही स्मार्ट जिम, छोटी घरं आणि फ्लॅटसाठी आहे. त्याची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.


मल्टीफंक्शनल मशीनसह संपूर्ण शरीराचा व्यायाम


आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या खोलीच्या कोपऱ्याला वर्कआउट झोन बनवू शकता. चार अभियंत्यांनी एक मल्टीफंक्शनल मशीन तयार केली आहे ज्याद्वारे शरीराच्या वरच्या आणि खालच्या बाजूचे व्यायाम केले जाऊ शकतात. आतापर्यंत देशातील 20 हून अधिक राज्यांमध्ये 200 हून अधिक लोकांनी ते खरेदी केले आहे.






मशीन तुम्हाला रिअल टाइम पर्याय देईल


आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, हे मशीन तुम्हाला 150 हून अधिक व्यायाम करण्याचा पर्याय देते. हे तुमचे वजन, वय आणि आरोग्यानुसार रिअल टाइममध्ये व्यायाम करण्यास मदत करते. आनंद महिंद्रा म्हणाले की, हे मशीन बनवण्यात कोणतेही रॉकेट सायन्स नाही, मात्र हे स्मार्ट मशीन बनवून चार तरुणांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. अगदी छोट्या खोलीतही तुम्ही ही जिम लावून घेऊ शकता.


हेही वाचा>>>


Health: 'कानात इअरफोनचा खरंच स्फोट होऊ शकतो का? कानांवर कसा होतो परिणाम?' आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात...


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )