SSC-HSC Board Exam : दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क मोजावे लागणार लागणार आहेत. या वर्षीपासून दहावी आणि बारावी परीक्षेत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त 50 रुपये आकारले जातील असं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलं होतं. परंतु विद्यार्थी, पालक तसंच शिक्षक संघटना आणि इतर काही संघटनांनी त्याला विरोध दर्शवत राज्य शिक्षण मंडळाकडे शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक विचार करुन आणि विद्यार्थी हित लक्षात घेऊन हे शुल्क कमी करण्यात आलं आहे.
कोणत्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण?
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या तसेच खेळाडू, एनसीसी, स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येतात. निकालाचा टक्का वाढवण्यास हातभार लावत असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे गुण महत्त्वाचे असतात. त्यामुळे विद्यार्थी सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी शाळा, शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव दाखल करतात. परंतु सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून प्रति विद्यार्थी 50 रुपये छाननी शुल्क हे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर करत असताना चलनाद्वारे किंवा रोख रक्कम भरणा म्हणून विभागीय मंडळ स्तरावर घेण्यात येत होतं.
50 रुपये छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय का?
शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव शाळा तसंच विभागीय शिक्षण मंडळाकडे येत असतात. या सर्व प्रस्तावांची छाननी करावी लागते. त्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधितांशी पत्रव्यवहार करुन त्रुटींची पूर्तता करावी लागते. त्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर रोजंदारी कर्मचारी नेमावे लागतात. या कामासाठी लागणारा वेळ, श्रम याचा विचार करुन 50 रुपये छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं होतं.
आता सवलतीच्या गुणांसाठी 25 रुपये शुल्क
परंतु राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पाहायला मिळला होती. यासंदर्भात वेगवेगळ्या संघटनांकडून निवेदनं प्राप्त झाल्यानंतर त्यांचा विचार करुन आणि विद्यार्थी हीत लक्षात घेऊन सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करत असताना, अर्ज करत असताना 50 रुपयांऐवजी आता प्रति विद्यार्थी 25 रुपये छाननी शुल्क म्हणून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने स्वीकारावं, अशाप्रकारच्या सूचना राज्य शिक्षण बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यावर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार असून, दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे.
संबंधित बातमी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI