NCC Day :  महाविद्यालयीन तरुणांमध्ये लष्करी शिस्त आणि जबाबदार नागरीक घडवणाऱ्या नॅशनल कॅडेट कोर (NCC)आज आपला 73 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. एनसीसीच्या स्थापना दिवसानिमित्ताने विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोविड महासाथीच्या काळात काही ठिकाणी एनसीसीच्या कॅडेट्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांना शिस्त आणि जबाबदार नागरिकाची बीजे रोवणाऱ्या या एनसीसीबाबत जाणून घेऊयात काही गोष्टी..


एनसीसीची स्थापना कधी झाली? 


एनसीसीची स्थापना 15 जुलै 1948 रोजी करण्यात आली. भारतीय संरक्षण कायदा-1917 नुसार लष्करातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने एनसीसीची स्थापना झाली. एनसीसीमध्ये 1949 पासून मुलींचा समावेश करण्यात येऊ लागला होता. 


नोव्हेंबरमध्ये एनसीसी दिवस का साजरा होतो?


एनसीसीची स्थापना 15 जुलै 1948 रोजी करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या दर चौथ्या रविवारी एनसीसी दिवस साजरा करण्यात येतो. त्याचे कारणही खास आहे. सन 1947 मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी दिल्लीत एनसीसीच्या पहिल्या युनिटची स्थापना झाली होती. 


पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात एनसीसी कॅडेटची भूमिका 


वर्ष 1965 आणि 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तानशी युद्ध झाले तेव्हा एनसीसी कॅडेट्सना शस्त्रास्त्र कारखान्यांमध्ये पाठवण्यात आले जेणेकरून ते आघाडीवर तैनात असलेल्या सैनिकांना शस्त्रे आणि दारूगोळा पाठविण्यात मदत करू शकतील. त्याशिवाय शत्रूंच्या पॅराट्रुपर्सना पकडण्यासाठीच्या गस्त पथकात त्यांचा समावेश करण्यात आला होता.  NCC कॅडेट्स नागरी संरक्षण अधिकार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून बचाव कार्यात आणि वाहतूक नियंत्रणातही मदत करतात.


एनसीसीमध्ये प्रवेश घ्यायचा?


एनसीसीमध्ये सहभाग घेण्यासाठी भारतीय नागरीक असणे आवश्यक आहे. त्याशिवाय नेपाळच्या नागरिकांनाही एनसीसीमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. एनसीसीत प्रवेश घेण्यासाठी किमान 12 वर्ष आणि अधिकाधिक 26 वर्ष अशी वयोमर्यादा आहे. 


>> एनसीसी प्रमाणपत्र 


एनसीसीमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना प्रवेश घेता येऊ शकतो. त्यामुळेच त्यांचे चार विभाग आहेत. प्रत्येकी दोन-दोन विभाग मुले आणि मुलींसाठी आहे. मुलांच्या विभागाला कनिष्ठ विभाग (JD) आणि वरिष्ठ विभाग (SD) आणि मुलींच्या विभागाला ज्युनियर विंग (JW) आणि वरिष्ठ विभाग (SW) म्हणतात.


NCC A प्रमाणपत्र


हे प्रमाणपत्र कनिष्ठ विभागातील त्या कॅडेट्सना दिले जाते. ज्यांनी 2 वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.


NCC B प्रमाणपत्र


हे प्रमाणपत्र वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांना दिले जाते. हे प्रमाणपत्र देखील दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच दिले जाते. 


NCC C प्रमाणपत्र


हे प्रमाणपत्र वरिष्ठ विभागातील 3 वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दिले जाते.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI