Mumbai University Examination : मागील काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परीक्षा आणि गोंधळ असे समीकरण झाल्याचे चित्र आहे. यंदादेखील मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या (T.Y.B.Com.) परीक्षेच्या हॉल तिकीटवरून गोंधळ झाला आहे. हॉल तिकीटवर परीक्षेची वेळ नाही, ना परीक्षेची तारीख, त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. या गोंधळावर आता मुंबई विद्यापीठाने स्पष्टीकरण दिले आहे. सध्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली हॉल तिकीट ही तात्पुरती असून लवकरच वेळापत्रकासह हॉल तिकीट देणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने म्हटले आहे.
मुंबई विद्यापीठाने हॉल तिकीट गोंधळावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, परीक्षेची ही प्रवेशपत्रे तात्पुरती आहेत. वेळापत्रकासह प्रवेशपत्रे लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. मुंबई विद्यापीठाने यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी दोन महिने आधी परीक्षेची प्रवेशपत्रे दिलेली आहेत. विद्यार्थ्यांचे नाव, त्यांनी घेतलेले विषय व इतर काही दुरुस्ती असेल तर ती करता यावी, या उद्देशाने ही अस्थायी प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत.
ही प्रवेशपत्रे अस्थायी असून वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर ते वेळापत्रक परीक्षेच्या प्रवेशपत्रावर प्रदर्शित होईल,अशा सूचना या प्रवेशपत्रावर देण्यात आल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. त्यानुसार आता वेळापत्रकासह प्रवेशपत्रे लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. तसेच आसन व्यवस्थाही ही देखील अस्थायी असून येत्या काही दिवसात निश्चित आसन व्यवस्था प्रदर्शित केली जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले.
मात्र, परीक्षेला अवघे चार ते पाच दिवस राहिले असताना विद्यार्थ्यांना नव्याने हॉल तिकीट विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर पुन्हा गोंधळ उडाल्यास विद्यार्थ्यांना मनस्ताप झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
प्रकरण काय?
मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होण्याआधीच गोंधळ झाला असल्याचा आरोप करण्यात आला. हॉल तिकीटवर ना परीक्षेची वेळ ना तारीख, ना आसन व्यवस्थेचे योग्य नियोजन होते. विद्यापीठाने परीक्षेची तातडीने योग्य नियोजन करण्याची युवा सेना ठाकरे गटाने मागणी केली होती. मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा 6 एप्रिल पासून सुरू होत आहे.
गोरेगाव पश्चिमेला असलेल्या यशभाई मगनभाई पटेल महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर 300 विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्यासाठी आसन क्षमता आहे. मात्र, 2000 विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. ठाकरे गटाच्या युवासेनेने आता ही बाब निदर्शनास आणल्यानंतर 1700 विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI