नवी मुंबई : सिडकोकडून नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वेचं काम गेल्या 10 वर्षांपासून अजून रखडलेलं आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचा वनवास अद्यापही संपलेला नाही. सिबिडि ते तळोजा पेंधरपर्यंत सिडको मेट्रो रेल्वे सुरू करणार आहे. मात्र कामाला विलंब झाल्याने अद्यापही मेट्रो कधी सुरू होणार याचा मुहूर्त ठरलेला नाही. पण त्यातच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी मेट्रोचे दरपत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे सिडकोकडून लग्नाआधीच वरात काढली जात आहे अशी टीकात्मक चर्चा रंगू लागली आहे.


सिडकोकडून नवी मुंबईत चार मेट्रो रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहेत. यातील पहिला मार्ग हा सिबीडी ते पेंधर पर्यंतचा 2012 रोजी सुरू करण्यात आला. एकूण 11 रेल्वे स्थानके या मार्गावर असून 3 हजार 63 कोटी रूपये इतका खर्च येणार होता. दरम्यान काम सुरु झाल्यानंतर 2016 मध्ये ही मेट्रो सेवा सुरू होईल, असे सिडकोने जाहीर केले होते. मात्र 2016 नंतरही पाच वर्ष उलटूनही अनेक डेडलाईननंतरही सिडकोला मेट्रो सुरु करता आलेली नाही. या महिन्यात पेंधर ते खारघर सेंन्ट्रल पार्कपर्यंत मेट्रो सुरू होणार होती. यासाठी मेट्रो ची चाचणीही गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. मात्र सद्या तरी मेट्रो सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे एकीकडे मेट्रो रेल्वे कधी सुरू होणार? याचा मुहूर्त निघत नसताना त्या आधीच मेट्रोतून प्रवास केल्यावर किती खर्च येणार? याची यादी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी जाहिर केली आहे.


ट्वीटमधून दरपत्रक जाहीर


संजय मुखर्जी यांनी ट्वीट करत मेट्रो प्रवासाला किती खर्च येणार आहे, याची माहिती दिली आहे. या मध्ये शून्य ते दोन किलो मीटर पर्यंत 10 रूपये, दोन ते चार किलो मीटर पर्यंत 15 रूपये आणि चार ते सहा किलो मीटर पर्यंत 20 रूपये असे दरपत्रक ठरवण्यात आले आहे. लवकरच मेट्रो सुरू होणार असल्याचे सिडको सांगत असली तरी फक्त पेंधर ते खारघर सेंट्रल पार्क अशी अर्धवट मार्गावरची मेट्रोच धावेल अशीही टीका नागरिकांकडून होत आहे.



बिल्डरांची चांदी


2016 मध्ये सिबिडि ते तळोजा पेंधर मेट्रो रेल्वे सुरू होणार, हे स्वप्न सिडकोने लोकांना दाखवले. सिबिडि, खारघर, तळोजा, पेंधर असा 11 किलो मीटरचा मेट्रो प्रवास या मार्गावरुन करता येणार आहे. यामुळेच बिल्डरांनी या भागात उभारलेल्या गृहप्रकल्पात मेट्रो येणार असल्याचे फोटो दाखवून कोट्यवधींची घरं विकली. सिडकोनेही जवळपास २५ हजारापर्यंत घरं या भागात उभारून गरजूंच्या गळ्यात मारली. मेट्रो येणार असल्याने दळणवळणासाठी सोपा मार्ग होईल या विचाराने नागरिकांनीही घरं घेतली. पण मेट्रोचं काम अजूनही रखडल्याने नागरिकांची परवड सुरू आहे. जवळपास रेल्वे स्थानक किंवा हायवे उपलब्ध नसल्याने स्थानिकांना महागडा प्रवास करावा लागत आहे.