मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक विषयांच्या पदवी परीक्षा रद्द अथवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. यावर आता वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा रद्द किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केलीय. मात्र, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्णता काळजी घेतली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. 


या संदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात देशमुख यांनी म्हटले आहे की, राज्यात कोवीड 19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू आहे, त्यामुळे 2 जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या 10 जूनपासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोवीड 19 प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयांनी केले आहे, असे असताना या परीक्षा रद्द कराव्यात, त्या पूढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी काही विद्यार्थी करीत आहेत. वास्तवीक पाहता वैद्यकीय महाविद्यालयाकडून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होवुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तीक ठरत नाही. केद्रिंय नियामक मंडळालाही ते मान्य नाही. शिवाय उच्च न्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरते आहे. एकंदरीत या पार्श्वभुमीवर सर्व विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरे जाणे हिताचे ठरणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही या संदर्भाने विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे परीक्षेसाठी त्यांना प्रेरीत करावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. 


मागच्या वर्षातील कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्र आरोग्य विदयापीठाने परीक्षा यशस्वीरीत्या घेतली असून त्या सुरक्षीत वातावरणात पार पडल्या आहेत. पुढच्या महिन्यात 10 जूनपासून वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संपुर्णतः कोवीड 19 सुरक्षा कवच पुरवीले जाणार असून त्यांच्या आरोग्याची सर्वेातोपरी काळजी घेतली जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन शेवटी या निवेदनात त्यांनी केले आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI