बारामती: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत, यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2019 च्या निवडणूक निकालानंतर राज्यात झालेल्या भेटी, चर्चा आणि घडामोडी याबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. त्यात उद्योगपती गौतम अदानी हे देखील पडद्यामागून सरकार स्थापनेत सहभागी असल्याचं समोर आलं आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये होत असलेल्या बैठकांमध्ये गौतम अदानींसह अन्य नेते उपस्थित असल्याचं गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका वाहिनीला मुलाखत देताना केला. त्यावर 2019 साली अमित शाह आणि अदानी यांनी मध्यस्थी केली होती का? असा प्रश्न अजित पवारांना विचारला असता, अजित पवार 'अशी कोणती मध्यस्थी झाली नव्हती' असं म्हणालेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
अजित पवारांनी एका मुलाखतीवेळी महाविकास आघाडी सरकार कसं बनलं आणि त्यावेळी झालेली राजकीय उलथापालथ यावर भाष्य केलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय घडलं, बैठक कुठं झाली, त्यावेळी कोण-कोण उपस्थित होतं. याबाबतची माहिती सगळ्यांना आहे. अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस, मी स्वत: आणि शरद पवार देखील त्या बैठकीत उपस्थित होते. पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने जे शरद पवार सांगतात, तेच आम्ही करत होतो असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे सरकार 80 तास टिकले कारण शरद पवारांनी पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पक्षातील बहुतांश आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले. त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित आली आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं असं अजित पवारांनी म्हटलंय.
शरद पवारांच्या मनाचा अंदाज कुणालाही बांधता येत नाही
मुलाखतीवेळी अजित पवार म्हणाले, शरद पवार असे व्यक्ती आहेत ज्यांच्या मनाचा ठाव किंवा अंदाज जगातील कोणत्याही व्यक्तीला सांगता येणार नाही. जगातील एकही व्यक्ती त्यांच्या बाबतीतील अचूक भाकीत वर्तवू शकत नाही. जगातील कोणतीही व्यक्ती नाही. ना माझी काकू (शरद पवारांच्या पत्नी), ना सुप्रिया, त्यांच्या मनात काय हे कोणी सांगू शकत नाही असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
खासदार प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणावर हल्लाबोल केला आहे, त्यांनी याबाबत सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत टीका केली आहे. एका डिजिटल प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत एका ज्येष्ठ मंत्र्याने गौतम अदानी कशाप्रकारे महाराष्ट्रात भाजपाचं सरकार यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितले. त्यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. ते भाजपाचे अधिकृत मार्गदर्शक आहेत का, ज्यांच्यावर युती करण्याची जबाबदारी देण्यात आली होती? महाराष्ट्रात कुठल्याही किंमतीत भाजपा सत्तेत यावी यासाठी इतक्या तत्परतेने त्यामागे काम का करत होते असा सवाल उपस्थित केला आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI