Jayashree Thorat : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) प्रचाराचा सपाटा सुरु आहे. अवघ्या काही दिवसांतच राज्याच्या राजकारणाचं पुढच्या पाच वर्षांचं चित्र स्पष्ट होईलच. पण त्याआधी मतदारांमध्ये प्रभाव पाडण्यासाठी प्रचारांचे दौरे सुरु आहेत. बहिण भावासाठी, लेक बापासाठी, आजोबा नातवासाठी, बाप लेकीसाठी अशी सगळीच मंडळी प्रचाराचं मैदान अगदी धुवून काढतायत. त्यातच बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) या देखील त्यांच्या वर्षभराच्या लेकाला घरी ठेवून प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. एबीपी माझासोबत संवाद साधताना जयश्री थोरातांनी भावूक होत प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात आठ वेळा निवडून येत विक्रम केला आहे.यावेळी नवव्यंदा ते निवडणुकीला सामोरे जात असून तालुक्याबरोबर राज्याचा दौरा देखील त्यांना करावा लागतोय.बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारासाठी त्यांचं कुटुंब देखील मतदार संघात दौरा करतंय. जयश्री थोरात या देखील आपल्या वर्षभराच्या मुलाला घरी ठेवून वडिलांसाठी मतदार संघात भेटीगाठी आणि संपर्क अभियान राबवत आहे.संगमनेर तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जात मतदारांशी संवाद साधत जयश्री थोरात आपल्या वडिलांच्या मताधिक्यासाठी प्रयत्न करत आहे.
माझा लेक मला माफ करेल - जयश्री थोरात
एबीपी माझासोबत संवाद साधताना जयश्री थोरात यांनी म्हटलं की,संगमनेर तालुका थोरात साहेबांचा परिवार आहे. पूर्ण तालुका एकजूट झाला असून मतदारांनीच थोरात साहेबांसाठी प्रचाराची मोहीम हाती घेतलीये. एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचं मला दिसून येतंय. मी रोज सकाळीच बाहेर पडते आणि रात्री उशीरा जाते. त्यामुळे मुलाची भेट होत नाहीये. त्याची आठवण येतेय. पण आता आठवडाच राहिलाय. त्यानंतर पूर्णवेळ त्यालाच देणार आहे. यासाठी तोही मला माफ करेल.
पुढे त्यांनी म्हटलं की, लोकसभेत पराभव दिसल्यानंतर लाडकी बहीण योजना आणण्यात आली. यांचं हिताचं नव्हे तर मताचं राजकारण आहे, हे आता महिलांना देखील समजून आलंय. त्यामुळे त्याचा प्रभाव मतदारांवर पडणार नाही. जे सरकार महिलांचा अपमान होऊ देतं, अत्याचार होऊ देतं, त्यांच्या सुरक्षेला केवळ 1500 रुपये देऊन चालणार नाही.