MJPRF : महाज्योती फेलोशिप (Mahatma Jyotiba Phule Research Fellowship) 2022-23 साठी नोव्हेंबर 2022 मध्ये अवॉर्ड पत्र घोषित करुनही अद्याप फेलोशिपचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. पीएचडी (PhD) करणाऱ्या ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपया देखील जमा झाला नसल्याचं समोर आलं आहे. तब्बल बाराशेपेक्षा अधिक विद्यार्थी पाच महिन्यांपासून फेलोशिपची रक्कम दर महिन्याला कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. 


बाराशेपेक्षा अधिक विद्यार्थी फेलोशिपच्या प्रतीक्षेत


महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने ओबीसी आणि व्हीजेएनटी वर्गातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती फेलोशिप (अधिछात्रवृति) देण्याचा निर्णय 2019 मध्ये घेण्यात आला. फेब्रुवारी 2022 मध्ये 2022-23 च्या फेलोशिपसाठी अर्ज भरण्यात आले. त्यानंतर सरकार बदलले नव्या सरकारने पुन्हा विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेतले. शिवाय नोव्हेंबर 2022 मध्ये या फेलोशिपसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जारी केली. त्यांना अवॉर्ड लेटर देण्यात आले. मात्र अद्याप पाच महिन्यांपासून बाराशेपेक्षा अधिक विद्यार्थी फेलोशिपचे रक्कम दर महिन्याला कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत, जेणेकरुन पीएचडी करत असताना विद्यार्थ्यांना काही प्रमाणात अर्थसहाय्य होईल. परंतु मागासवर्ग आणि बहुजन कल्याण विभाग यांच्याकडे पाठपुरावा करुन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर निर्णय होत नाही.


मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी


पीएचडीसाठीच्या पाच वर्षासाठी ही फेलोशिप देण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत घेण्यात आला होता. त्यामध्ये पहिल्या दोन वर्षी विद्यार्थ्यांना प्रति महिने 31 हजार अधिक एचआरए तर पुढील तीन वर्षासाठी प्रति महिना 35 हजार अधिक एचआरए अशी फेलोशिप राज्य सरकारकडून देण्यात येणार होती. या आधीच्या वर्षी अर्ज केल्या विद्यार्थ्यांनासुद्धा अद्याप फेलोशिप मिळाली नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. राज्य सरकारकडून या महाज्योती फेलोशिपची मोठी जाहिरात करण्यात आली शिवाय तितकीच मोठी घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात फेलोशिप देण्यासाठी टाळाटाळ राज्य सरकार करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. हेच का महाराष्ट्राचे गतिमान सरकार? असा सवाल पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. 


लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी व्हावी. जेणेकरुन आम्हाला या फेलोशिपचा फायदा घेता येईल आणि आमचं संसोधन कार्य अधिके वेगाने आणि चांगल्या प्रकारे करु शकतो, अशी मागमी हे विद्यार्थी करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


महाज्योतीच्या माध्यमातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, मासिक शिष्यवृत्तीत घसघशीत वाढ


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI