हिंगोलीतील लाडका सुनीलला 35 टक्के मिळाली अन् गावभर साखर वाटली....
हिंगोलीतील माळहीवरा येथील गावात सर्वांचा सर्वाधिक जास्त लाडका असलेला सुनील जाधवने दहावीत प्रत्येक विषयात 35 मार्क घेऊन पास होण्याचा पराक्रम केलाय. त्यामुळे त्याच्या कुटुंबात अन् त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सुनील म्हणतोय मी दहावीत पास झालोय यावरच माझा विश्वास बसत नाहीये. तर त्याच्या काकाने गावभर साखर वाटलीय. सुनील हा गावामध्ये धोंडू नावाने प्रसिद्ध आहे. तो थोडाफार विसरभोळा पण मनाने निर्मळ असल्यामुळे तो सर्वांचा लाडका आहे. प्रत्येकाच्या हाकेला हाक देणारा धोंडू सर्वांच्या गळ्याचे ताईत आहे. घरी दीड एकर शेती आणि एक भाऊ आई-वडील असा धोंडूचा परिवार असून रोजंदारी करून हे कुटुंब दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी करून कुटुंबाचा गाडा हाकतेय. तर धोंडू ही सुट्टीच्या दिवशी शेतात जाऊन रोजंदारी करून आई-वडिलांना मदत करतोय. अशाच परिस्थितीमध्ये दहावीचा निकाल लागला अन धोंडिबाला प्रत्येक विषयामध्ये 35 मार्क पडले आहे. त्यामुळे धोंडूचा तर आनंद गगनात मावेनासा झालाय, तसेच सर्वाधिक जास्त आनंद झालाय तो त्याच्या चाहत्या मित्रांना. अनेकांनी दिवसभर त्याचा मार्क मेमो स्टेस्ट्सला ठेवला होता. तर कुटुंबांनाही निकाल हाती येताच आई-वडिलांनी धोंडू याचे औक्षण करून पेढे वाटले. आम्हालाही विश्वास बसेना की आमचा धोंडू दहावीमध्ये पास झालाय, एवढेच नव्हे तर चाहतेही आता धोंडुला डोक्यावर घेऊन मिरवत आहेत. प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क घेणारे चर्चेत राहतात, तसाच हा धोंडूदेखील प्रत्येक विषयामध्ये 35 टक्के गुण घेऊन चांगलाच चर्चेत आला आहे. धोंडूचे मित्रमंडळ जागोजागी स्वागत करत आहेत. मला शिकून खूप मोठा साहेब व्हायचं स्वप्न धोंडू उराशी बाळगून आहे. माझे मी स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नसल्याचे धोंडू सांगतोय.
पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी गावातील दिपक डुकरेला 35 टक्के गुण
दहावीचा निकाल लागला आणि चर्चा सुरु झाली ती कुणी 100 टक्के मार्क घेतले कुणी 99 टक्के घेतले. मात्र या गुणवंतांच्या भाऊ गर्दीत सर्व विषयात 35% गुण घेणारे विद्यार्थीही आहेत परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील दिपक डुकरेने 35 टक्के गुण घेण्याची किमया केलीय. ज्याने अख्ख्या गावाचं नावलौकिक परभणी जिल्ह्यात झालंय. परभणीच्या पुर्णा तालुक्यातील गोदावरी वर वसलेल्या धनगर टाकळी गावातील शेतकरी बापुराव डुकरे यांनी त्यांचा मुलगा दिपक डुकरे याला परभणीत शिक्षणासाठी ठेवले होते शहरातील गजानन नगर मधील पारदेश्वर विद्या मंदिर शाळेत प्रवेश घेऊन त्याची अहिल्या देवी होळकर हॉस्टेल मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. वर्षभर शाळा,ट्युशन,अभ्यास एवढाच एक नियोजित अभ्यासाचा दिनक्रम संदिपचा असायचा. 10 वीची परीक्षा दिली काल निकाल लागला अन वर्षभर केलेल्या कष्टाचे फळ त्याला मिळाले. ते सर्व विषयात प्रत्येकी 35 गुण घेऊन. ५०० पैकी सर्व विषयांचे मिळून 175 मार्क घेत 35 टक्क्यांनी दिपक पास झाला.मी अभ्यास केला मात्र माझं अक्षर बरोबर नसल्याने मला एवढेच मार्क पडल्याचे तो सांगतो. दिपकची आई तो पास झाला यातच खुश आहे.
SSC Results 2020 Highlights : निकालात मुलींचीच सरशी, जाणून घ्या दहावीच्या निकालासंदर्भात दहा महत्वाचे मुद्दे
बीडमधील धनंजय नखातेने मिळवले सार्याच विषयात 35 गुण!
माजलगाव तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्याने सर्वच विषयात 35 गुण मिळवत स्वत:कडे सार्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. धनंजय नारायण नखाते असे या 35 टक्के गुण घेणार्या विद्यार्थ्याचे नाव. त्याचे वडील मजुरीचे काम करतात. धनंजय हा उमरी (ता.माजलगाव) येथील रामेश्वर विद्यालयात शिक्षण घेतो. मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत धनंजयने सर्वच 6 विषयात काठावरचे म्हणजेच 35 गुण मिळवले आहेत. त्याला एकुण 500 गुणांपैकी 175 गुण मिळाले आहेत. योगायोग म्हणा की, शिक्षण मंडळाकडून दिला जाणारा ग्रेस या माध्यमातून त्याला प्रत्येक विषयात 35 गुण मिळालेत. सहाजिकच इतके तंतोतत गुण कोणत्याही विद्यार्थ्याला मिळत नाहीत. मात्र धनंजयचा बुधवारी निकाल हाती आला तेव्हा सर्वच विषयात 35 चा आकडा दिसला,तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान धनंजय नखाते या विद्यार्थ्याचे शार्दूलेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव सोंळके, मुख्याध्यापक पोगावाड, सुरेश इनामकर यांनी अभिनंदन केले आहे.
फलटणमधील शिवानी तांदळेला देखील 35 टक्के
साताऱ्यातील फलटणमधील आचार्य बाळ शास्त्री जांभेकर या शाळेतील शिवानी तांदळेला देखील 35 टक्के मार्क्स पडले आहेत. आता हिच्या या कौतुकात मोठा वाटा तिच्या शिक्षकांचाही असणार यात शंका नाही. आता त्यांना तर तिची गुणवत्ता ही शरद पवारांच्या गुणवत्तेला जोडून ती पुढे शरद पवारांसारखेच नाव लौकिक करेल असे वाटते. काहीही असो टॉपर आले त्यांची दखल सर्वांनी घेऊन त्या विद्यार्थांच तोंडभरुन कौतुक केलंच. मात्र या अशाही विद्यार्थांच कौतुक तर झालंच पाहिजे.
पन्नासाव्या वर्षी बारावी उत्तीर्ण, मुंबईतील महिलेच्या जिद्दीची कहाणी
अंबरनाथमधील क्षितिजला सगळ्या विषयात 35 गुण
अंबरनाथ पूर्वेच्या बारकू पाड्यात क्षितिज राहतो. क्षितिजचे वडील रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे, तर मोठी बहीण बारावीला आहे. क्षितिज 9 वीत नापास झाल्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे त्याने 17 नंबरचा फॉर्म भरत दहावीची परीक्षा दिली. आणि अखेर निकाल लागला, आणि सगळ्या विषयात 35 गुण मिळवत क्षितिज पास झाला. यासाठी रात्रंदिवस अभ्यास केल्याचं क्षितिज सांगतो. खरंतर जास्त गुणांची अपेक्षा होती, पण आता पास झाल्याचाही आनंद असून पुढे डॉक्टर इंजिनिअर होण्याचं क्षितिजचं स्वप्न आहे, किंवा आयटीआय करून सरकारी नोकरी करण्याचीही त्याची तयारी आहे. क्षितिजचे वडील अंबरनाथ शहरात रिक्षा चालवतात. दिवसभर मेहनत करायची आणि त्यावर दिवस काढायचा, असं करत त्यांनी जिद्दीने मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला. क्षितिज पास होईल, अशी खात्री त्यांना होती. पण मुलाला मिळालेले मार्क्स पाहून आता तो पास झाला यातच आम्ही समाधानी असल्याची कुटुंबियांची भावना आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI