मुंबई : इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम हा दिवाळीनंतरच सुरू होण्याची चिन्ह आहे. सीईटी परीक्षा उशिरा घेतल्याने त्याचे निकालाला सुद्धा सप्टेंबर महिना उजाडला आहे. खरंतर ज्या महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले पाहिजे त्या महिन्यात सीईटी परीक्षा झाल्याने इंजिनिअर प्रथम वर्षाचे कॉलेज दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंजिनिअरिंग शैक्षणिक वर्षाचा बट्ट्याबोळ होणार आहे.
नुकताच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणारे जवळपास तीन लाख विद्यार्थी इतके दिवस परीक्षेच्या आणि त्यानंतर निकलाच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी आता प्रवेश फेऱ्यांचा प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रतीक्षा वर प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दिवाळीनंतरच कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. कॉलेज सुरू झाल्यानंतर अगदी 7 ते 8 महिन्यात प्रथम वर्षाचे दोन्हीही सत्र पूर्ण करायचे आहेत
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जूनमध्ये जाहीर झाला. मात्र सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा निकाल उशिरा जाहीर झाल्याने जुलै - ऑगस्ट महिन्यात इंजीनिअरिंग प्रथम वर्ष कॉलेज सुरू व्हायला हवं त्या महिन्यात सीईटी परीक्षा घेतल्या गेल्या. त्यानंतर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर झाला आहे. तर ऑक्टोबर मध्ये प्रवेश फेऱ्या पूर्ण होऊन नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कॉलेज सुरू होण्याची चिन्ह आहेत
नेमका इंजिनिअरिंग प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे वेळापत्रक कसे असते?
- मे जून महिन्यात सीईटी इंजिनिअरिंग परीक्षा आणि निकाल
- जुलै ऑगस्ट महिन्यात इंजिनिअरिंग प्रथम वर्षाला सुरुवात
- दिवाळीनंतर डिसेंबर जानेवारी महिन्यात इंजिनिअरिंग प्रथम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षा पूर्ण होतात
- प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून मे जून महिन्यात द्वितीय सत्र परीक्षा पूर्ण होऊन प्रथम वर्ष पूर्ण होतं
त्यामुळे आता डिसेंबरमध्ये इंजिनिअरिंग प्रथम वर्ष सुरू झाल्यानंतर सहा ते सात महिन्यात दोन्ही सत्रांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षकांना पूर्ण करायचा आहे. हे शिक्षकांसमोर खूप मोठे आव्हान असणार आहे. इंजीनिअरिंग प्रथम शैक्षणिक वर्ष हा विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा असतो. इंजीनिअरिंग कॉलेजच्या वातावरणात समरस होण्यासाठी आणि आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी प्रथम वर्षाचा काळ इंजिनिअरिंग मध्ये महत्त्वाचा मानला जातो. मात्र प्रथम वर्ष अर्ध्या वेळेत पूर्ण करावं लागणार असल्याने विद्यार्थ्यांचं मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे
मागील वर्षी कोरोनामुळे इंजीनियरिंग प्रथम वर्ष अभ्यासक्रम उशीरा सुरू झाल्याने जो बट्ट्याबोळ झाला तो सलग दुसऱ्या वर्षी होत आहे. वर्षभराचा अभ्यासक्रम सहा महिन्यात पूर्ण कसा करायचा असा प्रश्न प्राध्यापकांसोबत विद्यार्थ्यांसमोर सुद्धा 'आ' वासून उभा राहणार आहे. आता या आव्हानात्मक परिस्थितीतून विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पूर्ण करायचे आहे आणि त्यासाठी दिवाळीनंतर पूर्ण ताकदीने तयार राहायचं आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI