पिंपरी-चिंचवड : ऑनलाईन शिक्षणाची प्रणाली पालकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. मोबाईल, टॅब अथवा लॅपटॉपच्या अतिवापरामुळं मुलं त्रस्त झाली आहेत. शिवाय भविष्यात काही व्याधी जडण्याची भीती देखील आहे. यावर तज्ञांनी खबरदारीचे उपाय देखील सुचवले आहेत.
कोरोना आला अन् शाळा 'लॉक' झाल्या. ऑनलाईन शिक्षण सुरु झालं खरं, पण या पर्यायाने मुलं मात्र 'डाऊन' झाली आहे. व्हिडीओ कॉलिंगद्वारे तासंतास शिक्षण घेतल्याने हि परिस्थिती उद्भवली आहे. मोबाईल, टॅब अथवा लॅपटॉप याकडे मुलं एकटक अथवा जवळून पाहतात. यामुळं डोळे जळजळ करणे, डोळे लाल होणे, पुरेशी झोप न होणे, डोकेदुखीचा त्रास होणे अशा तक्रारी मुलांकडून केल्या जात आहे.
लॉकडाऊननंतर मुलांमधील हे बदल पालकांसाठी चिंतेचा विषय ठरलेत. शिवाय भविष्यात पाठदुखी, कंबरदुखी, मान लचकणे अशा व्याधींचा त्रास होण्याची भीती ही पालकांना वाटत आहे. लॉकडाऊनपूर्वी आम्ही त्याच्या हातात मोबाईल देणं टाळत होतो. पण आता ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्याने, मोबाईल हातात द्यावा लागतो. त्यानंतर बाहेर जाणं बंद असल्याने, मी स्वतः त्याच्यासोबत खेळते. पण मी माझ्या घरकामात गुंतले की त्याला मोबाईल हातळण्याशिवाय पर्याय राहत नाही. आता त्याच्या दृष्टीला घेऊन आम्हाला चिंता लागलीये. रात्री उशिरा झोपणे अन् उशिरा उठणे असे बदल ही जाणवत आहेत. तर ऑनलाईन शाळा सुरु असताना तो खुर्चीवर व्यवस्थित बसतो. पण दिवसभर मोबाईल हाताळताना त्याच्या बसण्याची पद्धत आमच्यासाठी चिंतेचा विषय बनली आहे. पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे असे त्रास त्याला भविष्यात होतील का? अशी भीती देखील पालकांनी व्यक्त केली आहे.
ऑनलाईन शिक्षणामुळं उद्भवणारे धोके टाळण्यासाठी 'या' गोष्टी करा
- मोबाईल, टॅब अथवा लॅपटॉप मुलांपासून दीड ते दोन फूट अंतरावर ठेवा
- दर वीस मिनिटांनी किमान वीस सेकंद थोडं दूरचं पहायला सांगा
- पापण्यांची किमान वीस वेळा उघडझाप करायला सांगा
- चष्मा लागलेला असल्यास त्याचा वापर करावाच
- मुलांच्या बसण्याची पद्धत ही सांभाळा
ऑनलाईन शिक्षण घेण्याविना सध्या कोणताच पर्याय उरलेला नाही. त्यामुळं पालकांनी मुलांकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे, तसं न केल्यास त्यांच्या दृष्टीला घेऊन काही प्रश्न उद्भवू शकतात. तसं काही वाटल्यास वरच्यावर डोळ्यांची तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. देशातून जो पर्यंत कोरोना हद्दपार होत नाही, तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण हे घ्यावंच लागणार आहे. त्यामुळं तुमच्या मुलांना सुदृढ ठेवायचं असेल तर तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यांचं पालन करणे आवश्यक आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI