Student Suicide : मागील दोन वर्षांपासून सैन्य भरतीसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. सचिन असे या मृत तरुणाचे नाव असून तो हरयाणातील जिंद जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. सचिनच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. सचिन हा रोहतक येथील पीजी हॉस्टेलमध्ये वास्तव्य करत होता. राहत्या खोलीत त्याने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे.
जिंद जिल्ह्यातील लिजवाना येथील कला गावात राहणारा सचिन मागील दोन वर्षांपासून भारतीय लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. रोहतक येथील देव कॉलनीत तो पीजी हॉस्टेलमध्ये राहत होता. सकाळी पीजीच्या विद्यार्थ्यांनी त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह पाहिला. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत सचिनच्या कुटुंबीयांनी सांगितले की, भारतीय लष्करात सहभागी होण्याचे त्याचे स्वप्न होते. मागील दोन वर्षांपासून तो त्यासाठी तयारीदेखील करत होता.
पीजी हॉस्टेलमधील मृत सचिनचा मित्र गौरव याने सांगितले की, नोकरीच्या मुद्यावरून तो चिंतेत असल्याचे सांगितले. सचिन हा सैन्य भरतीसाठी दोन वेळेस पात्र ठरला होता. मात्र, त्याची भरती झाली नाही. या मुद्यावरून तो चितेंत होता.
केंद्र सरकारने जाही केलेल्या अग्निपथ योजनेला मोठा विरोध सुरू आहे. या योजनेमुळे लष्करातील भरती प्रक्रिया ही कंत्राटी स्वरुपाची होणार असल्याची भीती तरुणांमध्ये आहे. या कारणामुळेदेखील आत्महत्या झाली का, याचीही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. बुधवारी बिहारमध्ये या योजनेविरोधातील आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आज अनेक जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. आज हरयाणातील गुरुग्राममध्येही आंदोलन झाले. आंदोलक विद्यार्थी-युवकांनी गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केला आहे. पलवलमध्ये ही रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
अग्निपथ योजनेला विरोध का?
केंद्र सरकारने जाहीर केलेली योजना चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे. केंद्र सरकार फक्त चार वर्षांसाठी सैन्यात दाखल करून घेणार, त्यानंतर निवृत्ती स्वीकारण्यास सांगणार आहे. त्यानंतरच्या आयुष्यात काय करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
चार वर्ष सेवा बजावल्यानंतर 25 टक्के अग्निवीरांना लष्करात कायम स्वरुपी नोकरी देण्यात येणार आहे. मात्र, दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या अग्नीवीर झालेल्या 75 टक्के युवकांकडे कोणता पर्याय असणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. चार वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर केंद्र सरकारकडून या युवकांना जवळपास 12 लाख रुपयांचा सेवा निधी देणार आहे. मात्र, या युवकांना पर्यायी रोजगार देण्यासाठी कोणती योजना सरकारकडे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.