Yavatmal Crime :  यवतमाळच्या (Yavatmal Crime) आर्णी येथील सराफ व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून बंदुकीच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना (Yavatmal Police) यश आले आहे. यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि आर्णी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत या लूटमार करणाऱ्या टोळीला उमरखेड येथून अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयित आरोपीसह त्यांच्याकडील 25 लाख 92 हजार रुपयाचा मुद्देमालही जप्त केला आहे. पोलिसांनी मिळलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत यातील संशयित आरोपी शेख अफसर शेख शरीक याला पोलिसांनी अटक केली.


चौकशी दरम्यान त्यांच्या सोबत त्याचे इतर साथीदार असल्याचे देखील उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी इतरांचा शोध घेतला असता,  शेख निसार शेख उस्मान, फैय्याज खान बिसमिल्ला खान, शेख जमीर शेख फैमोद्दीन (सर्व रा. उमरखेड) यांना अटक करण्यात आली आहे. तर यातील आणखी एक संशयित आरोपी शाकीब खॉं  अय्युब खॉं  हा फरार आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून यात आणखी काही गुन्हे उघड होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.


 सक्रिय टोळीला अटक


डोळ्यात मिरची पुड फेकून बंदुकीच्या धाकावर काही अज्ञातांनी दोन सराफ व्यापाऱ्यांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यात सराफ व्यापाऱ्यांकडून रोख रक्कमेसह 27 लाखांचा मुद्देमाल या दरोडेखोरांनी लंपास केला होता. ही घटना  4 मार्च रोजी यवतमाळच्या (Yavatmal Crime) आर्णी तालुक्यातील सदोबा सावळी येथे सायंकाळी घडली होती. याप्रकरणी सराफा व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Yavatmal Police)अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर लुटमारीच्या गुन्ह्याची वाढते प्रमाण आणि यापूर्वी झालेल्या गुन्ह्यांमधील आरोपींची पद्धत सारखीच असल्याने, यात कुठली टोळी सक्रिय असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.  त्यावरून पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत त्या दिशेने या प्रकरणाचा तपास करीत असतांना यातील सक्रिय टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.  


27 लाखांचा मुद्देमाल केला होता लंपास


यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील रहिवासी असलेले सोनार विशाल देविदास लोळगे आणि रंजित काटे यांचे सावळी सदोबा येथे गोविंद ज्वेलर्स नामक सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. त्यामुळे हे दोघे आपल्या कारने दररोज ये-जा करतात. दरम्यान, 4 मार्च, सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते सदोबा सावळी येथील दुकान बंद करून दुकानातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोख घेवून आर्णीकडे परत जात होते. दरम्यान, कार सावळी रोडवरील विटाची भट्टी ते कुऱ्हा फाट्यादरम्यान आली असताना काही 4 ते 5 आज्ञातांनी त्यांची टाटा नेक्सान कंपनीची कार (कार क्र. एमएच 29 बीव्ही 7128) अडवली. त्यांनतर या व्यक्तीनी कारच्या काचा फोडून त्यातील रक्कम आणि दाग दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला.


मात्र विशाल आणि रंजितने त्यांना विरोध केला असता त्यातील एकाने विशाला बंदुकीचा धाक दाखवला, तेवढ्यात दुसऱ्याने या दोघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. भर रस्त्यात सिनेस्टाईल पद्धतीने सुरू असलेल्या या प्रकारात 4 ते 5 आज्ञातांनी कार मधील बॅग घेऊन पळ काढला होता. या बॅगेत 1 लाख 80 हजाराची कॅश आणि 400 ग्रॅम सोने, असा एकूण 27 लाखांचा मुद्देमाल या दरोडेखोरांनी लंपास केला होता.


इतर महत्वाच्या बातम्या