Yavatmal Crime : माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत 19 वर्षीय विवाहित तरुणीला सासरच्या लोकांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काळी दौलत खान इथ घडली. या घटनेने खळबळ उडाली असून विवाहित तरुणी दहशतीत आली. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अजूनही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ होणं ही पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे.


महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील मुस्कान परवीन हिचा विवाह काळी दौलतच्या शेख शाहरुख शेख सलीम यांच्याशी 24 ऑक्टोबर 2019 रोजी झाला होता. त्यानंतर सासरच्या लोकांनी परवीनला माहेरुन पैसे आणण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देणे सुरु केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर तिला मारहाण सुद्धा करत होते. त्यानंतर मुलीचा संसार सुखात चालवा म्हणून परवीनच्या वडिलांनी चाळीस हजार रुपये मुस्कानचे पती शाहरुखला दिले. मात्र तरीसुद्धा ते पैशांसाठी तगादा लावत होते.


मुस्कानचे पती शाहरुख शेख सलीम, सुलतान शेख सलीम, शबाना बी शेख इनुस, रुबीनाबी मुनाफ या चार जणांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात 19 वर्षीय परवीनचा पाय भाजून दुखापत झाली. या घटनेनंतर परवीनने सासरी कोणालाही कळू न देता मोबाईल फोनवरुन आपल्या वडिलांशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वडील आले आणि मुलगी मुस्कानला माहेरी घेऊन गेले. त्यानंतर मुस्कानने सासरच्या लोकांविरोधात पुसद ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवली. 


याआधीही सासरच्या मंडळींकडून त्रास
एवढंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी सासूने मुस्कानला जबरदस्तीने दूध पिण्यास दिले होते. हे दूध प्यायल्यानंतर तिला उलट्या मळमळ आणि चक्कर यायला लागली आणि तोंडातून फेस सुद्धा यायला लागला होता. त्यावेळी तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले होते, असा आरोप मुस्कानने सासरच्या मंडळींविरुद्ध केला होता. मुस्कानच्या तक्रारीवरुन पुसद ग्रामीण पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या



Beed : वंशाला दिवा मुलगाच हवा म्हणून परळीत क्रूरतेचा कळस, बळजबरीने गर्भलिंग निदान करून विवाहितेचा गर्भपात