मुंबई : वरळीत घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. हे अमानुष कृत्य करणारा मिहिर शाह तब्बल 60 तासांनतर गजाआड झाला आहे. मात्र, त्याने हे कृत्य कसं केलं त्याचा घटाक्रम मात्र तळपायाची आग मस्तकात जाईल असा आहे. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वरळीमधील हिट अॅण्ड रनची घटना घडून 60 तास उलटल्यावर मिहिर शाहाला तुरुंगात डांबण्यात आलं आहे. महिरची आई आणि बहिणीसह 12 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


बेटा पकडला, शिक्षा कधी?


प्रदीप नाखवांचा हा आक्रोश अजूनही प्रत्येकाच्या मनातून जात नाहीय. खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा हाकणारी सहचारिणी जगातून कायमची निघून गेली आणि संपूर्ण नाखवा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या घरातल्या दोन लेकरांची आई काळाच्या पडद्याआड गेली ती कायमचीच. मात्र कावेरी नाखवा यांच्या आयुष्याची दोरी बड्या बापाची औलाद असणाऱ्या मिहिर शाहने अशी कापली की, कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.


वरळी हिट अँड प्रकरणाचा A to Z घटनाक्रम वाचा


पहाटे साडेपाच वाजता अंधाऱ्या रस्तावरून प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा मासे घेऊन स्कूटरवरून चालले होते. मासे विकून चांगले पैसे मिळतील, अशी स्वप्न रंगवत असतानाच मागून अलिशान बीएमडब्ल्यू कारने त्यांना अशी धडक दिली की, प्रदीप नाखवा बोनेटवर कोसळले आणि कावेरी नाखवा चाकाखाली गेल्या. प्रदीप नाखवा यांनी विनवणी करूनही महिर शाह थांबला नाही. त्याने कावेरी नाखवा यांना चाकाखाली आलेल्या कावेरी यांनी फरफटत नेलं. 


मृत कावेरी या अपघातात कारच्या बंपर आणि चाकामध्ये अडकल्या होत्या. सुमारे दोन किलोमीटर कावेरी यांना तसेच फरफटत आणल्यानंतर वरळी सीफेसला मिहिर शहा आणि शेजारी बसलेला राजऋषी बिडावत यांनी चाकात अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढले आणि तसेच रस्त्यावर टाकले. त्यानंतर आरोपींनी मोटरगाडी बाजूने न नेता कावेरी यांच्या अंगावरून नेली आणि तिथून पळ काढला.


कसा पळाला मिहिर शाह? 


अपघातानंतर गाडी थांबवायची सोडून मिहिरने कावेरी यांनी फरफटत कार भरधाव वेगाने नेली. दोन किलोमीटरवर सीफेस येथे चाकात अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढलं आणि कावेरी यांच्या अंगावरून कार नेली. त्यांनतर वांद्रे कलानगर परिसरात कार आणि राजऋषी बिडावतला सोडून पळ काढला. मिहिरला वडील राजेश शाहने पळून जाण्याचा सल्ला दिला, त्यानंतर मिहिर गोरेगावला मैत्रिणीच्या घरी गेला. मैत्रिणीच्या घरून मिहिर शाह मित्रासह शहापूरच्या रिसॉर्टला गेला, नंतर फोन बंद केला.


मिहिरच्या मित्राने मोबाइल 15 मिनिटांसाठी सुरू केला आणि लोकेशन ट्रेस झालं. बोरीवलीच्या पथकाने तातडीने जाऊन मिहिरला बेड्या ठोकल्या. मिहिरची आई, बहीणही अटकेत आहेत.  मिहिर शहाने दारूच्या नशेत केलेलं हे कृत्य फक्त कायद्याला पायदळी तुडवणारंच नव्हतं, तर ते मानवता आणि नैतिकतेचाही मुडदा पाडणारं होतं. आता अटक करण्यात आली असली तरी, त्याला अशी शिक्षा व्हायला हवी की, बड्या बापाच्या अशा औलादी दारू ढोसून असं कृत्य करायला धजायला नको.