पुणे: पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी पहाटे साडेपाच वाजता फलटणला जाण्यासाठी निघाली होती. त्यासाठी ही तरुणी स्वारगेट एसटी आगारात (swargate st depot) आली होती. याठिकाणी शिवशाही बसने (Shivshahi Bus) या तरुणीला फलटणला जायचे होते. त्यावेळी एसटी आगारात असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे या गु्न्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीने तिची दिशाभूल करुन तिला दुसऱ्या एका बसमध्ये नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला.
स्वारगेट पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या स्वारगेट एसटी डेपोत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही तरुणी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट एसटी आगारात आली. फलटणला जाण्यासाठी कोणती बस आधी सुटेल, अशी विचारणा ती करत होती. त्यावेळी दत्तात्रय गाडे या गुन्हेगाराने तिला पलीकडची शिवशाही बस आधी सुटले, असे सांगितले. पहाटेची वेळ असल्याने त्यांच्या आजुबाजूला कोणीही नव्हते. दत्तात्रय गाडेकडे बघून या तरुणीला संशयही आला. फलटणची शिवशाही बस याच फलाटावर लागते, हे मला माहिती आहे, असे तरुणीने दत्तात्रय गाडेला म्हटले. मात्र, पलीकडची शिवशाही बस फलटणला आधी निघेल, असे पुन्हा दत्तात्रय गाडेने म्हटले. त्यामुळे ही तरुणी पलीकडच्या शिवशाही बसच्या दिशेने गेली. यावेळी दत्तात्रय गाडे तिच्यासोबतच होता. दुसऱ्या बसच्या लाईट बंद असल्याने तरुणीला पुन्हा संशय आला. त्यावर दत्तात्रय गाडे याने तुम्हीच बसमध्ये चढून खात्री करा, असे तरुणीला सांगितले. ही तरुणी शिवशाही बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडेही तिच्या पाठोपाठ बसमध्ये शिरला आणि तिच्यावर अत्याचार केले.
या घटनेमुळे तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यामुळे दत्तात्रय गाडे याने अतिप्रसंग केल्यानंतर ही तरुणी त्या बसमधून बाहेर पडली आणि दुसऱ्या बसमध्ये चढली. तिथून ती फलटणला आपल्या गावी गेली. तिकडे तिने आपल्या नातेवाईकांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकाराची तक्रार पोलिसांत केली. त्यानंतर पोलिसांनी स्वारगेट एसटी आगारातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दत्तात्रय गाडे याची ओळख पटवली. यानंतर पुणे पोलिसांची पथके नराधम दत्तात्रय गाडे याचा शोध घेत आहेत.
आरोपी सराईत गुन्हेगार
तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला सोनसाखळी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती. तो जामिनावर बाहेर असल्याची माहिती समजत आहे.
आणखी वाचा