Wardha News वर्धा : वर्धा जिल्ह्यातील (Wardha News) पुलगावात अनवाणी पायाने फिरणाऱ्या चिमुकल्या राजा आणि राणी या दोन भावंडांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बुट्टीबोरी येथील आपल्या आई-वडिलांपर्यंत पोहचता आले आहे. अवघा 9 वर्षाचा राजा आणि 7 वर्षाची राणी हे दोघेही बहीण-भाऊ आई वडिलांच्या रागावण्याने घर सोडून बाहेर पडले होते. त्यानंतर अचानक हे दोघे भावंडं एकाएकी दिसेनासे झाल्याने एकच खळबळ उडाली होती. रागाच्या भरातून घरातून निघाल्या नंतर या चिमुकल्यांनी रेल्वेने नागपूर (Nagpur) येथून पुलगाव गाठलं.
तसेच हे दोघे आणखी पुढे दुसऱ्या जिल्ह्यात जाणार तोच वर्ध्याच्या पुलगाव शहरात फिरणाऱ्या दोघांकडेही श्रीकांत कुमरे या सामाजिक कार्यकर्त्यांची नजर गेली. आस्थेने विचारपूस करताच चिमुकल्यानी आपबीती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आई वडिलांचा शोध घेतला आणि पुलगाव पोलिसांच्या मदतीने दोघांनाही बुट्टीबोरी येथे मजुरी करणाऱ्या त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
आई -वडील रागावले, चिडलेल्या बहीण भावाने थेट घर सोडले
आई-वडिलांनी आपल्याला रागावले या क्षुल्लक कारणावरून अवघा 9 वर्षाचा राजा आणि त्याची 7 वर्षाची राणी यांनी एक धाडसी पाऊल उचलले. यात त्यांनी थेट घर सोडत मिळेल ती वाट धरली. मात्र रागाच्या भरात उचललेले हे पाऊल मोठ्या संकटात नेणारे देखील ठरू शकलं असतं. मात्र पुलगाव शहरात श्रीकांत कुमरे या सामाजिक कार्यकर्त्यांची नजर या दोघा भावंडांवर पडली. आस्थेने विचारपूस केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर कुमरे यांनी या भावंडांची समजूत काढली आणि पोलिसांच्या मदतीने दोघांना सुखरूप त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलंय.
राजा प्रदीप श्रीवास्तव आणि राणी प्रदीप श्रीवास्तव हे मूळचे मध्य प्रदेशच्या शिवणी येथील रहिवासी आहेत. त्यांचे आई वडील मजुरी कामाने बुट्टीबोरी येथे आल्याने तेही बुट्टीबोरी येथे वास्तव्यास आहे. मात्र आपली दोन्ही मुले घरातून निघून गेल्याने ते मोठ्या विवंचनेत होते. दरम्यान दोन्ही मुले सुखरूप घरी परतल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. तर मुलांना पोहचवण्यासाठी धडपड कामी आल्याचा आनंद पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कुमरे यांनी व्यक्त केलाय.
असाच काहीसा प्रकार नागपूर जिल्ह्यात देखील उघडकीस आला आहे. घरची मंडळी बाहेर फिरायला जाऊ देत नसल्यामुळे मध्य प्रदेशातील एका 13 वर्षीय मुलाने घरून पळ काढला. तो सैरसपाटा करण्याच्या हेतूने घरून पळून गेला. मात्र, त्याचे अपहरण झाले असावे, या संशयामुळे कुटुंबीय आणि पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, त्यासंबंधाने माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्या बेपत्ता मुलाला शोधून त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. गजेंद्र नामक हा मुलगा मुलताई, जि. बैतुल (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या