Wardha Crime : वर्ध्याच्या (Wardha) हिंगणघाट (Hinganghat) इथे विषारी औषध पाजून 19 वर्षीय प्रेयसीला (Girlfriend) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसी बोलत नसल्याने माथेफिरु प्रियकराचा राग अनावर झाला आणि त्याने हे कृत्य केलं. इतकंच नाही तर त्याने स्वत: देखील विषारी औषध प्राशन केलं. दोघांनाही उपचारांसाठी सेवाग्राम रुग्णालात दाखल करण्यात आलं आहे. अमन निखार (वय 22 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. शनिवारी (28 जानेवारी) ही घटना घडली होती.
प्रेयसी बोलत नसल्याने प्रियकराचा राग अनावर
प्रेयसी फोन उचलत नाही, बोलत नाही याच गोष्टीचा राग 22 वर्षीय तरुणाने मनात धरला होता. अमन निखारने तरुणीला भेटण्यासाठी बोलावलं होतं. परंतु ती सातत्याने नकार देत होती. त्यातच मागील आठवड्यात काही कामानिमित्त मैत्रिणीसोबत घराच्या बाहेर पडली. तरुणी कलोडे मंगल कार्यालय परिसरात आली असता या आरोपीने तिला वाटेत गाठलं. त्यानंतर तिला जबरदस्तीने आपल्या गाडीवर बसवून निर्जन स्थळी नेलं.
आरोपी तरुणाचाही स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न
माझ्याशी का बोलत नाहीस या कारणावरुन आरोपीने तरुणीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढला आणि रागाच्या भरात त्याने आपल्यासोबत आणलेलं विषारी औषध तिला बळजबरीने पाजलं. दरम्यान तरुणाने देखील औषध पीत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र प्रियकराची प्रकृती चिंताजनक आहे.
आरोपी तरुणावर गुन्हा दाखल
पीडितेची तक्रार आणि वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी माथेफिरु तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हिंगणघाट येथील ज्ञानेश्वर वॉर्डात राहणाऱ्या आरोपी अमन निखार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी तरुण अमन निखार याच्याविरुद्ध कलम 307, 328, 309 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत.
हिंगणघाट जळीतकांडची आठवण
हिंगणघाट इथे काही वर्षांपूर्वी घडलेल्या जळीत कांड प्रकरणामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. पोलीस देखील तशी खबरदारी घेत आहेत. हिंगणघाटमध्ये 3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या विकेशला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. अखेर दोन वर्षांनी या खटल्याचा निकाल देण्यात आला. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील दोषी विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
हेही वाचा