बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घुले यांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी तुरुंगात नेहमीप्रमाणे बंदी उठवण्यात आली होती. सकाळी नाश्ताच्या वेळी बंदी उठवल्याने सर्व कैदी बाहेर मोकळे होते. त्यावेळी महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघेजण वाल्मिक कराड याच्या अंगावर धावून गेले. तेव्हा बाजुलाच असणारा सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला. मात्र, महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महादेव गिते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराड याने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे सांगितले जाते. त्याचा राग या दोघांच्या मनात असल्याने त्यांनी वाल्मिक कराडला मारहाण केली असावी, अशी शक्यता भाजप आमदार सुरेश धस यांनी बोलून दाखवली. वाल्मिक कराड याने अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केले आहेत. त्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता धस यांनी व्यक्त केली.
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड जिल्हा कारागृहात आणल्यापासूनच याठिकाणी काहीतरी अघटित होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. अखेर ही शक्यता खरी ठरली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तातडीने अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये हलवले जाण्याची शक्यता आहे. तुरुंग प्रशासनाने वाल्मिक कराड याला मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. या घटनेनंतर बीड जिल्हा तुरुंगातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी
परळीतील आरोपींमध्ये हा वाद झाल्याची पुष्टी जेल प्रशासनाने पुष्टी दिली आहे. फोन लावण्यावरुन हा वाद झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. गेल्या दीड-दोन तासांपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी याची चौकशी करत आहेत. या चौकशीतून काय समोर येणार, हे बघावे लागेल. भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड कारागृहात वाल्मिक कराडला विशेष वागणूक दिली जात असल्याचा दावा केला आहे. त्याला स्वतंत्र जेवण आणि फोनची सेवा पुरवण्यात आल्याचे धस यांनी म्हटले.
आणखी वाचा
बबन गिते गँगने बीड जेलमध्येच डाव साधला, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला धुतला, सुरेश धस यांचा दावा!