वसई : चप्पल, बॅग ठेवण्यावरून वसईत प्रवाशी लॉज मध्ये एका 54 वर्षाच्या व्यक्तीची धारदार हत्याराने छातीत वार करून निर्घृणपणे हत्या (Vasai Crime) केली असल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. या बाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. राजेश शहा ( वय 54) असे आरोपीचे नाव आहे तर राधाकृष्ण व्यंकटरमन ( वय 58 ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 


आरोपी आणि मृत व्यक्ती हे दोघेही वसई रोड पश्चिम परिसरातील एका प्रवाशी लॉज मध्ये राहत होते. आरोपी राजेश शहा हा वाहन चालक असून मागच्या चार वर्षांपासून या लॉज मध्ये राहत होता. तर हत्या झालेले राधाकृष्ण हे गायक असून मागच्या चार दिवसांपूर्वीच या लॉज मध्ये राहण्यासाठी आले होते. आज दुपारच्या सुमारास बॅग आणि चप्पल ठेवण्यावरून या दोघांत वादविवाद सुरू झाला होता


दोघांमधील हा वाद वाढला आणि या वादातून राजेश शहा याने चक्क धारदार चाकूने राधाकृष्ण यांच्या छातीत एक जोरदार वार केला. त्यात चाकू त्यांच्या छातीत रुतून बसला. हा रुतून बसलेला चाकू काढण्याचा प्रयत्न झाला, पण तो निघाला नाही. शेवटी लॉज व्यवस्थापकाला ही घटना कळाल्यावर त्याने जखमीला बाजूच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान जखमीचा मृत्यू झाला. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली आहे.


आईच्या चारित्र्यावर संशय घेत मुलाने केली हत्या


गेल्या महिन्यात वसईत अशीच एक घटना घडली होती. वसईच्या माजिवली देपिवली ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्य महिलेची तिच्याच मुलाने राहत्या घरात गळा चिरुन हत्या केली. ही घटना वसई तालुक्यातील देपीवली गावात रविवारी (20 ऑगस्ट) रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली होती. सुनिता सुनिल घोघरा (वय 36 वर्षे) असे या महिलेचे नाव असून ती याच गावात आपल्या कुटुंबासह राहत होती. ही महिला मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली देपिवली ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत सदस्यपदी निवडूनही आली होती. स्वत:च्या मुलाने आईच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने वार करत आईची हत्या केली आहे. आरोपी मुलगा 17 वर्षांचा आहे. 


सुनिता घोघरा वालीव परिसरात नोकरीला जात होती रविवार सुट्टी असल्याने या दिवशी ती घरात होती. रात्रीचे जेवण करुन महिला आपल्या खोलीत झोपी गेली असता तिच्या अल्पवयीन मुलाने आपल्या तिच्यावर कुऱ्हाडीने तीन वार करुन घराबाहेर गेला. काही वेळाने मृत महिलेचा पती घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीला जखमी अवस्थेत बघून तिला उपचारांसाठी भिवंडी येथे रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र संबंधित घटनेची नोंद मांडवी पोलिसात करण्यात आली. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत तिचा पतीला ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर  मुलाची चौकशी केली असता आपणच आईची हत्या केल्याचे मुलाने कबूल केले. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.


ही बातमी वाचा: