पिंपरी चिंचवड : एटीएममधून रोख रक्कम लुटण्यासाठी चोरट्यांनी चक्क स्फोट केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. हा स्फोट करण्यासाठी चोरट्यांनी जिलेटीन कांड्यांचा वापर केला. एवढं सगळ करुन चोरट्यांना रोकड काही लुटता आली नाही. त्रिवेणीनगर परिसरात पहाटे पावणे चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणीही मृत अथवा जखमी झालेलं नाही.
कॅनरा बँकेचे हे एटीएम आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी या धाडसी चोरीचा प्रयत्न केला. त्यांनी एटीएमजवळ जिलेटीन कांड्या ठेवल्या तर पंचवीस मीटर अंतरावर वायर टाकली आणि कशाच्या तरी सहाय्याने करंट पास करुन हा स्फोट घडवण्यात आला. पण या स्फोटामुळे केवळ मशिनच्या वरचा पत्रा बाजूला झाला. मशिनमध्ये असलेल्या रोकडच्या वर असलेला जाड पत्रा मात्र तसाच राहिला. अशातच स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक बाहेर आले अन् या दोन्ही चोरट्यांना रिकाम्या हातानेच पळ काढावा लागला.
या प्रकरणी चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत याआधी ही असे स्फोट करुन एटीएममधील रोकड लुटण्यात आलेली आहे.
चाकणमध्येही याआधी असाच प्रकार
याआधी सुमारे नऊ महिन्यांपूर्वी चाकणमध्ये असाच प्रकार घडला होता. चोरट्यांनी स्फोटकांनी एटीएम उडवलं. मशिन फुटल्यानंतर त्यामध्ये ठेवलेला पैशांचा बॉक्स घेऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी एटीएममधून 28 लाख रुपये लुटले. या एटीएममध्ये 40 लाख रुपयांची रोख रक्कम होती.
नगरमध्येही स्फोटकांचा वापर करुन एटीएम फोडलं
तर काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या संगमनेर शहरात दोन चोरट्यांनी डिटोनेटरचा वापर करुन स्फोट घडवला आणि एटीएम फोडून 20.77 लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. स्फोटात सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान झाल्याचं संगमनेर शहर पोलिसांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या