नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुहेगारीनं चांगलंच डोकं वर काढलं आहे. नाशिकमधील भद्रकाली परिसरात उठलेली दंगल आणि तडीपार गुंडाने केलेली हत्या, यांमुळे आता आता नाशकात पोलीस आपलं काम चोख बजावत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर हा प्रकार घडला नसता असा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून केला जातोय.


एका हत्येच्या घटनेने नाशिक सध्या हादरून गेलं आहे. शहरातील भद्रकाली परिसरातील महालक्ष्मी चाळीमध्ये सोमवारी रात्री तडीपार गुंड विशाल बैनवालने आपल्या साथीदारांच्या मदतीने हातात धारदार शस्त्रे मिरवत दंगल घडवून आणली. यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे, जुन्या भांडणाचा राग मनात धरत तसेच पोलिसांना टिप देत असल्याच्या संशयावरून आकाश रजवे आणि करण लोट यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. आकाशच्या पोटात, मानेवर या टोळीने धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. त्यानंतर तिथून पळ काढला. आकाश रक्ताच्या थारोळ्यात सापडला आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. तर आकाशचा मित्र करणही यामध्ये गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. तर मयताच्या नातेवाईकांनी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.


विशेष म्हणजे पोलिसांनी जर वेळीच दखल घेतली असती तर आकाशचा जीव वाचला असता, आरोप आता आकाशच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. कारण काही गुंडांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन मारहाण केल्याबाबत मृत आकाश आणि त्याच्या मित्रांनी घटनेच्या दीड तासापूर्वीच भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


या घटनेप्रकरणी पोलिसांनी एकूण 9 आरोपींविरोधात हत्या, हत्येचा कट, दंगल, प्राणघातक हल्ला आणि धारदार शस्त्रे बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून यातील 6 जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर तडीपार गुंड विशाल बैनवालसह 2 जण फरार आहेत. जुलै 2019 पासून विशालला शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र तडीपार असूनही त्याचा शहरात वावर कसा? तसेच हा गुंड सडेआम दहशत माजवत असतांनाच पोलीस कुठे होते? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.


गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात प्राणघातक हल्ले, मारहाण, घरफोडीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आणि त्यातच आता असे प्रकार समोर येत असतील तर अशा गुंडांच्या पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळणे गरजेच आहे. नाहीतर नाशिकचे नागपूर होण्यास वेळ लागणार नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :