मुंबई : अंधेरी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) डिझेल चोरीचा भांडोफोड केलाय. रेल्वेचे डिझेल चोरी करून ते विकणाऱ्या एका ठेकेदाराला आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींजवळ डिझेलने भरलेले चार ड्रम मिळाले असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत. मोहम्मद इस्माईल शेख आणि संतोष पांडे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून यातील शेख हा जेसीबी ऑपरेटर असून पांडे हा ठेकेदार आहे.
अंधेरी आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेला ठेकेदार पांडे हा गेल्या पाच वर्षांपासून रेल्वेसाठी ठेकेदारी करतो. त्याला पश्चिम रेल्वेकडून बोरीवली पासून चर्चगेटपर्यंतच्या 72 पंपिंग मशिनमध्ये डिझेल भरण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पावसाळ्यात या सर्व 72 पंपिंग मशिन्सवर डिझेल भरण्याचे काम पांडेकडे सोपविण्यात आले होते. करारानुसार रेल्वेकडून डिझेलचा पुरवठा करण्यात आला होता. पांडे याला रेल्वेकडून 3000 लिटर डिझेल देण्यात आले होते. पाऊस संपल्यानंतर पांडे याच्याकडे देण्यात आलेल्या 3000 लिटर डिझेलचा हिशोब मागण्यात आला. त्यावेळी त्याने 3000 लिटरमधील 2200 लिटर डिझेलचा पंगिंग मशिन्ससाठी वापर केला होता. तर उर्वरित 800 लिटर डिझेल रेल्वेचे उमेश गुप्ता या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीने मोहम्मद शेख याला विकण्यात आले अशी माहिती पांडे याने पोलिसांना दिली आहे. विक्री करण्यात आलेल्या डिझेलची किंमत जवळपास 75000 हजार रूपये आहे.
संतोष पांडे याच्याकडून रेल्वे अधिकारी उमेश गुप्ता यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी केली जात आहे. सध्या ही चौकशी प्राथमिक टप्यात असून आतापर्यंत गुप्ता यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत असून दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. सखोल चौकशी केल्यानंतरच या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहेत आणि या घोटाळ्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे याची माहिती मिळणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
संतोष पांडे याने या पूर्वी अशा प्रकारे डिझेलची चोरी केली आहे का? याचा पोलिस कसून तपास करत आहेत. त्याने यापूर्वी देखील अशी डिझेल चोरी केली असेल तर हा मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. शिवाय यात आणखी अधिकाऱ्यांचा किंवा इतर कोणाचा समावेश आहे का? याचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या