ठाणे : एखाद्या बॉलीवूडच्या सिनेमाला ही लाजवेल अशी वास्तवात कामगिरी वसईच्या पोलिसांनी केली आहे. वसई पोलिसांनी तब्बल 250 किमीचा पाठलाग करत, चोरांना भारताची हद्द पार करण्याच्या आत अटक केली आणि चोरीचा बहुतेक माल रिकव्हर केला आहे. वसईमध्ये डॉक्टराच्या घरात चोरी झाली होती आणि ही चोरी पोलिसांनी अवघ्या 48 तासात उजेडात आणली आहे.


हे एखाद्या पिक्चरमधील कथानक असल्यासारखं वाटेलं. मात्र वसईच्या पोलिसांनी हा कारनामा करुन दाखवला आहे. जवळपास 250 किमीचा पाठलाग करत चोरांना भारताची बॉर्डर पार करण्याच्या आत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आणि त्यांच्याकडून बहुतेक चोरीचा माल ही हस्तगत केला आहे.


गेल्या महिन्याच्या 30 तारखेला बाभोला येथे राहणाऱ्या एका डॉक्टरच्या घरात चोरी झाली होती. घरातील सर्वजण 28 नोव्हेंबरला लग्नानिमित्त घराबाहेर गेले होते. याचाच फायदा घेत घरच्या नेपाळी सुरक्षा रक्षकाने आपल्या अन्य तीन नेपाळी साथिदारांसह धाडसी चोरी केली. घरातील सहा लॉक तोडून, सोनं, चांदी तसेच घरातील मौल्यवान सामान असा 15.20 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला होता.


घरातील सुरक्षा रक्षकच गायब असल्याने पोलिसांना सुरक्षा रक्षकावरच संशय आला. त्यांनी लगेच चार पथक तयार करुन, जलद गतीने तपासाची चक्रे फिरवली. डॉक्टरकडे असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या माहितीवरुन पनवेल येथे गेल्यावर त्यांनी यांचे नातेवाईक सुरत येथे राहात असल्याच सांगितलं. त्यानंतर पोलिसांचं एक पथक लगेच गुजरातच्या सुरतला गेले. त्यानंतर सुरत येथे हे तिघे ही गोध्रा बसमध्ये चढले असून, ते नेपाळला जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी भाड्याने गाडी घेवून, सुरत ते गोध्रा असं 250 किमीच अंतर कापत या तिघांनाही भारताची हद्द पार करण्याअगोदर  चोरीच्या मालासह अटक केली आहे.


सुरेंद्र अम्रीत बोगोटी, झपातसोप शरपजीत सोप, शेरबहाद्दूर फुलबहाद्दूर शाही असं या तिघांची नावे असून, तिघेही मुळचे नेपाळचे राहणारे असून, ते वॉचमॅनचं काम करतात. यातील सुरेंद्र बोगोटी हा डॉक्टरकडे सुरक्षा रक्षकाचं काम करायचा. याच्यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर याच्यांकडून 180 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 8 किलो वजनाचे चांदीचे दागिने, 10 घडयाळे, 1 लॅपटॉप, 1 आयपॅड आणि रोख रक्कम 1.23 लाख असा एकूण 13.93 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :