पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून गायब असलेले उद्योजक आनंद उनवणेंची हत्या झाली आहे. त्यांचा मृतदेह महाडच्या सावित्री नदी किनारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येमुळं अनेक प्रश्न उपस्थित झालेत.


एफएफआय चिटफंड कंपनीचे मालक आनंद उनवणे 4 फेब्रुवारी पासून गायब होते. आणि आता थेट महाडमध्ये त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.


पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतलेले आनंद उनवणे सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गायब झाले त्या दिवशी उनवणेंनी घरातून मॅनेजरला फोन केला आणि खात्यातील चाळीस लाख रुपये मागवून घेतले. पैसे घेऊन आलेल्या चालकाला ते पैसे त्यांनी गाडीत ठेवायला सांगितले. काहीवेळाने मात्र पैसे घरातील दागिने घेऊन उनवणे गायब झाले होते.



उद्योजक आनंद उनवणेंचा मोबाईल काही मिनिटांसाठी स्विच ऑन व्हायचा, त्याच लोकेशनचा आधार घेऊन पोलीस तिथं पोहचायचे पण तिथं उनवणे नसायचे. काल मात्र महाडच्या सावित्री नदीकडेला उनवणेचा मृतदेहच आढळला. ते नेमके इथं कसे पोहचले? त्यांची नेमकी हत्या कोणी केली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.


पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल असली तरी उनवणेंच्या सहकाऱ्यांनी त्यांचं अपहरण झाल्याचा ही दावा केला आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनू लागलंय. हा गुंता पोलीस सोडवतीलच पण चिटफंडमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची चिंता दूर होणार का?