Thane Crime News: कामाच्या ठिकाणी मालकाच्या त्रासाला वैतागून नोकराने टोकाचे पाऊल उचलले. अन्य सहकाऱ्याच्या मदतीने नोकराने मालकाला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर मृतदेह लपवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. मात्र, मृतदेह फुगल्याने त्याचा हात जमिनीबाहेर आला आणि हत्या झाल्याचे समोर आले. टिटवाळा पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.


टिटवाळामध्ये (Titwala News) मालकाच्या त्रासाला कंटाळून नोकराने आपल्या मित्रांच्या  मदतीने मालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना टिटवाळ्यात उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर नोकराने मालकाच्या मृतदेह पुरला. त्यावर मेलेल्या म्हशीचा मृतदेह टाकला होता. मात्र दोन दिवसानंतर मृतदेह  फुगला आणि त्याचा हात बाहेर आला. त्यानंतर या क्रूर हत्येचा उलगडा झाला. सचिन माम्हाने असे मयत मालकाचे नाव असून या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी सुनील मौर्या या नोकरासह त्याचे मित्र शुभम गुप्ता ,अभिषेक मिश्रा यांना अटक केली आहे.


टिटवाळा परिसरात सचिन म्हामाने यांच्या पत्नीचे  इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिकचे दुकान आहे. सात एप्रिलला सचिन कामानिमित्त बाहेर गेले ते पुन्हा घरी परतले नाही. सचिन यांच्या कुटुंबीयांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनीदेखील त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.


दरम्यान बदलापूर दहा गाव रोडवर  सचिन यांची गाडी तोडफोड केलेल्या अवस्थेत आढळली. या गाडीची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तपास सुरू केला. या प्रकरणात आणखी काही माहिती, धागेदोरे मिळतात का, यासाठी आजुबाजुला शोध घेतला. 


अखेर दहागाव येथील निर्जन स्थळी एक मृतदेह पुरलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह सचिन यांचा असल्याचे स्पष्ट झाले. सचिन यांची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले. मात्र त्यांची हत्या का केली, कुणी केली याचा उलगडा करत आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे  होते. 


वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर व गुन्हे प्रगतीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता तपासादरम्यान दुकानात काम करत असलेला सुनील मौर्या याने आपले साथीदार अभिषेक मिश्रा व शुभम गुप्ता यांच्या मदतीने हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ या तिघांचा माग काढत तिघांनाही बेड्या ठोकल्यात.