ठाणे : ठाण्यात सोनसाखळी आणि मोबाईलचोरांनी धुमाकूळ घातला आहे. सोनसाखळी चोरटे आणि मोबाईल चोरट्यांमुळे रस्त्यावर चालणाऱ्या महिलांसोबतच रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलाही असुरक्षित झाल्यात, असेच चित्र दिसत आहे. बुधवारी रात्री नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरट्याने महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावल्यानंतर तोल जाऊन महिला रिक्षातून खाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नका परिसरात घडली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चोरटे मात्र दुचाकीवरून फरार झाले होते. अखेर नौपाडा पोलिसानी फरारी दुकलीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र आरोपीच्या नावाबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगलेली आहे. 
 

  
मृतक कन्मिला रायसिंग(27) ही महिला मुळची मणिपूरमधील आहे. त्या मुंबईच्या कलीना सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण अशा दोघी ठाण्यातील एका मॉलमध्ये काम करतात. काल मॉलमधूल घरी निघालेल्या या दोघींनी कलीना येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षा मुंबईच्या दिशेने निघाली होती. त्यांची रिक्षा तीन हात नाकाजवळ आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींपैकी दुचाकीच्या मागे बसलेल्या आरोपीने धावत्या रिक्षातील कन्मिला हिच्या हातातील मोबाईल खेचला. मोबाईल वाचविण्यासाठी कन्मिलाने प्रयत्न केले आणि कन्मिलाचा रिक्षातून तोल जाऊन ती खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर महिलेला जखमी अवस्थेत जवळच्या एका रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविले. मात्र अवघ्या दीड तासांत कन्मिला हीचा मृत्यू झाला. 


या घटनेनंतर नौपाडा पोलिसांनी विविध पथके बनवून तांत्रिक माहितीच्या आधारे दोघा आरोपीना अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे. या घटनेनंतर पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी अशा प्रकारचे गुन्हे घडू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील आणि अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :