मुंबई : घाना देशाचे सरकारी कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे.  मात्र पूर्व विभाग सायबर पोलिसांनी वेळीच या ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकून गजाआड केले आहे.


सध्या ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणत समोर येत आहेत. अशाच प्रकारे मुलुंडचे रहिवासी असलेले व्यापारी रविश हेब्बर यांना तब्बल 36  लाख 62 हजार 407 रुपयांना एका टोळीने गंडा घातला होता. घाना या देशाच्या शासकीय यंत्रणेला लागणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर, गिअर बॉक्सचे कंत्राट मिळवून देण्याचा नावाखाली एका टोळीने त्यांना संपर्क केला होता. या कंत्राटसाठीची प्रोसेसिंग फी त्यांना भरायला सांगितली. त्यांनी ही लाखोंची फी ऑनलाइन भरली देखील मात्र त्यानंतर या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व संपर्क बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या बाबत पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्याला संपर्क करून गुन्हा दाखल केला. 


सायबर सेलने याचा तपास सुरू केला. या टोळीने या गुन्ह्यासाठी वापरलेली  तब्बल 47 बँक खाती पोलिसांनी तपासली. क्वालिटी इंटरप्रायजेस आणि सिटी इंटरप्रायजेसच्या नावाने ही खाती उघडण्यात आली होती. या बँकेतील एका खात्यातून एक व्यक्ती नवी मुंबई येथे एटीएममधून पैसे काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवून यातील पहिला आरोपी मोहम्मद आझाद मोहम्मद हनिफला अटक केली.  त्याने दिलेल्या माहितीवरून सुरेश कुमार सुंदरलाल लहरे, भुवनेश्वर कुमार भीषणलाल सतनामी, गोविंद मनिराम साहू या आणखी तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


नवी मुंबईत भाड्याने घरे घेऊन त्या घरांचा पत्त्यावर विविध कंपन्या नोंदणी करून त्यावरून बँक मध्ये खाती उघडायची आणि या खात्याच्या आधारे नागरिकांची फसवणूक करायची असे गुन्हे ही टोळी करीत असे. अशा प्रकारे 47 बँक खात्यांची चेकबुक, पासबुक, 36 डेबिट कार्ड , 16 मोबाईल, 22 सिमकार्ड पोलिसांनी हस्तगत केले आहे. तर या बँक खात्यातून कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे ही समोर आले आहे. 


 या प्रकरणी आणखी आरोपी पोलीस शोधत असून यात आफ्रिकन, नायजेरियन आरोपी असल्याचा ही पोलिसांना संशय आहे.