Thane Crime News Update : डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी एक अजब चेन स्नॅचर टोळीला पकडले आहे. एक बाईक चालवायचा तर दुसरा त्याच्या मागे बसून चेन स्नॅचिंग करायचा. धक्कादायक म्हणजे जो बाईकवर मागे बसायचा तो पायाने दिव्यांग आहे. या दोघांनी मिळून आत्तापर्यंत पाच शहरात चेन स्नॅचिंग केल्याचे उघड झाले आहे. मानपाड पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या


डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विजय सेलच्या समोर एक चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने, पोलिस अधिकारी अविनाश वनवे, प्रशांत आंधळे, संपत फडोळ यांच्या  मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. पोलिस सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीपर्यत पोहचले. रायगड येथील मानगाव परिसरातून दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये सुखविंद सिंग आणि विरु राजपूत अशी या चोरट्यांची नावे आहे. धक्कादायक म्हणजे सुखविंदर सिंग हा दिव्यांग आहे. तो बाईकवर मागे बसतो. विरु हा बाईक चालवितो. संधी मिळताच सुखविंद हा नागरीकांच्या अंगावरील दागिने हिसकवितो. त्यानंतर दोघेही बाईकवरुन पसार होत होते. या दोघांनी पाच शहरात धुमाकुळ घातला होता. त्यांच्याकडून पोलिसांनी साडे सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एकीकडे समाजाकडून अपंग असलेल्या व्यक्तीविषयी सहानुभूती दाखविली जाते. मात्र त्याच अपंग व्यक्तीकडून अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे केले जात असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे.


दोन चेन स्नॅचर यांच्याबद्दल 18 डिसेंबर रोजी मानपाडा पोलिसात तक्रार करण्यात आली होती. 48 वर्षीय वसंताकुमारी नायर यांनी या दोघांबद्दल तक्रार केली होती. त्यांनी तक्रारीत म्हटले होते की, वसंताकुमारी बालाकृष्णण नायर, व त्यांची मुलगी गौरी वय 16 वर्षे या दोघी विजय सेल्स समोरून पेंढारकर कॉलेजकडे रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी चालत जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या काळे रंगाच्या मोटार सायकलवरील 2 अनोळखी चोरटयांनी फिर्यादीचे गळ्यातील 18 ग्रॅम वजनाचे 72000 रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने खेचून चोरी करून नेले. सदर बाबत फिर्यादी यांनी दिनांक 18/12/2023 रोजी मानपाडा पोलीस स्टेशनला येवून दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.  


गुन्हा दाखल झाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी सी. सी. टी. व्ही. फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे अज्ञात आरोपीचा येण्याचा व जाण्याचा मार्ग शोधला. आरोपी चेन स्नॅचिंग करून मोटार सायकलवरून रायगड जिहयातील मानगांवमध्ये गेल्याचे दिसून आले. त्यानंतर सापळा लावून दोघांनाही बेड्या ठोकल्या.