Thane Rave Party Case : नववर्षाच्या पूर्व संध्येला ठाण्याच्या कासारवडवली गावात खाडीलगत आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने (Thane Police Crime Branch) छापा मारत ही पार्टी उधळून लावली होती. ठाणे पोलिसांनी (Thane Police) या प्रकरणी दोन आयोजकांसह 97 जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी आयोजक डोंबवली येथील तेजस कुबल आणि ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या सुजल महाजन यांना अटक केली आहे. तर, रेव्ह पार्टी सुरू असलेल्या जागा मालकाचा शोध सुरू आहे. तर, सहभाग असलेल्या 90 हून अधिकजणांची सुटका केली असल्याची चर्चा सुरू आहे.
ठाणे रेव्ह पार्टी प्रकरणी डोंबवली येथील तेजस कुबल आणि ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या सुजल महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 4 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर रेव्ह पार्टीसाठी जागा देणाऱ्याचा शोध सुरू असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गुन्हे शाखा युनिट-5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि त्यांचे सहकारी पोलीस पथकाने वर्षाच्या अखेरीस यंदाची मोठी कारवाई केली. याच पथकाने वर्षभरात अमली पदार्थ विक्रीस आलेल्या अनेक आरोपींना गजाआड करून लाखो कोट्यवधीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 31 डिसेंबरच्या पहाटे कासारवडवली खाडी लगत आयोजित रेव्ह पार्टीची माहिती मिळताच कारवाई करून 8 लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या ड्रग हस्तगत केले. रेव्ह पार्टी आयोजन करणाऱ्या तेजस कुबल आणि सुजल महाजन यांना अटक केली.
या पूर्वीही डिसेंबर महिन्यात रेव्ह पार्टी केल्याची माहिती
ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 च्या ताब्यातील आरोपी तेजस कुबल आणि सुजल महाजन यांच्या चौकशीत या जोडगोळीने यापूर्वीही डिसेंबर महिन्यात रेव्ह पार्टी केल्याची सूत्रांनी दिली. त्यानंतर त्यांनी 31 डिसेंबरच्या पार्टीचे आयोजन केले.
पार्टीत सहभागी 95 जणांना समुपदेशन करून सोडले?
कासारवडवलीतील रेव्ह पार्टी सहभागी झालेल्या आयोजक व्यतिरिक्त 95 जणांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांना समुपदेशन करून सोडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थांचा वापर
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद अवस्थेत पार्टीमध्ये सामील झाल्याचं दिसून आलं. एका खाजगी प्लॉटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये नशा करण्यासाठी विविध अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल असे विविध अंमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आले होते.