ACB Case Against Narendra Mehta : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  (ACB) गुन्हा दाखल केला आहे. नरेंद्र मेहता यांनी बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एसीबीने मेहता यांची पत्नी सुमन मेहता यांनादेखील आरोपी केले आहे.  मिरा-भाईंदर भागामध्ये नरेंद्र मेहता हे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना बंडखोरीचा फटका बसल्याने थोडक्यात पराभव झाला होता. 


भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम 1988 चे कलम 13 (1)(इ), 13(2) सह भादंवि संहिता कलम 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


माजी आमदार नरेंद्र मेहता 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2015 या कालावधीत मीरा भाईंदर महापालिकेचे नगरसेवक होते. त्याशिवाय मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. याकाळात लोकसेवकपदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांनी उत्पन्नापेक्षा 8 कोटी 25 लाख 51 हजार 773 रुपये एवढी अधिक मालमत्ता, संपत्ती जमा केली असल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर ठेवला आहे. त्याशिवाय, त्यांची पत्नी सुमन मेहता यांनी लोकसेवक नरेंद्र मेहता यांनी गैरमार्गाने जमवलेल्या केलेल्या मालमत्तेचा विनियोग करण्यास मदत केल्याचाही ठपका त्यांच्या पत्नीवर ठेवण्यात आला आहे. 


याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून नरेंद्र मेहता आणि सुमन मेहता यांच्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहता यांचे घर आणि कार्यालयाची झडती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


नरेंद्र मेहता यांनी बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमा केली असल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानंतर मेहता यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मेहता यांच्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.


महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई सुरू असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी राज्यातील तपास यंत्रणांकडे करण्यात आल्या. त्यामध्ये सध्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे.