Mumbai Crime News: भिवंडी शहरात मोबाईल चोरीचा संशयावरून एका युवकाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर आणि या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी अवघ्या तीन तासात हत्या झालेल्या युवकाची ओळख पटवली. त्यानंतर सात नराधम आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गोविंदनगर राहुल हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पाईपलाईन नजीकच्या रस्त्याजवळ एक अनोळखी व्यक्तीची कोणीतरी अज्ञात कारणावरून हत्या केल्याची घटना रात्री साडेआठ वाजता समोर आली. या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी तपास पथक घटनास्थळी दाखल होतं. त्यांनी मयत व्यक्तीच्या सोबत त्याची ओळख पटवून देणारी कोणतीही माहिती नसताना परिसरात माहिती घेत त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला.
त्यानंतर त्याचं नाव मोहम्मद रहमत शहा आलम वय 20 वर्षे रा.कलकत्ता पश्चिम बंगाल असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती तपासात समोर आल्यानंतर पोलीस पथकाने गुप्त बातमीदार मार्फत व मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळवून अरमान अन्सारी या मुख्य आरोपी सोबत त्याचे पाच ते सात आरोपी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर मोबाईल चोरीच्या संशयावरून लाकडी मारदांड्याने त्यास बेदम मारहाण करून जीवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा समजल्यानंतर अवघ्या तीन तासात पोलिसांनी या हत्या करणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे.यातील अजून काही आरोपी असून त्यांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश येथे पोलिस पथक रवाना केले आहे.