Sujay Vikhe Patil-Balasaheb Thorat: माजी खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांच्या सभेत भाजपचे नेते वसंत देशमुख यांच्या एका विधानामुळे संगमनेरमध्ये विखे आणि थोरात यांच्यात वाद रंगला आहे. वसंत देशमुख (Vasant Deshmukh) यांनी माजी मंत्री आणि विद्यामान आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. वसंत देशमुख यांच्या या विधानाचे राज्यात पडसाद उमटत आहे. विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान सुजय विखे यांच्या मातोश्री शालिनीताई विखे पाटील (Shalini Vikhe-Patil) यांनी आक्रमक भाषण करत सडेतोड उत्तर दिलं आहे.
शालिनीताई विखे-पाटील काय म्हणाल्या?
चांगलं काम काही लोकांना बघवत नाही. त्यामुळे विघ्न आणण्याचे काम ठराविक मंडळी करत आहे. वसंत देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेलाच आहे. खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जे भाषण केलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आहे. सहनशीलतेला सुद्धा काहीतरी अंत असतो. सुजय विखेंचे सर्व भाषण मुद्देसूद असतात, मी आई म्हणून ऐकत असते. आपल्या मुलाचे तोंडून एकही वाक्य चुकीचे जाऊ नये, असे संस्कार आम्ही दिलेले आहे, असं शालिनीताई विखे पाटील यांनी सांगितले.
सुजय विखे मेलेल्या आईचा दूध प्यायलेला नाही...- शालिनीताई विखे-पाटील
डोक्यावर पडला म्हणून आरोप करतात. परंतु कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नसतं. आपण भाषण करताना काय तारतम्य बाळगलेला आहे. याचा विचार सुद्धा केला पाहिजे. ते जर खालच्या पातळीवर बोलत असतील, तर सुजय विखे मेलेल्या आईचा दूध प्यायलेला नाही...जशास तसे उत्तर देईल, असा इशारा शालिनीताई विखे पाटील यांनी दिला. आपण कुणीही बांगड्या भरलेले नाही. ठोशास ठोशा देण्याच कर्तव्य आपलं आहे. खालच्या पातळीवर आपण कोणीही जाता कामा नये. वसंतराव देशमुख यांच्याकडून गेलेल्या चुकीच्या शब्दाचा सर्व शिर्डी मतदारसंघातर्फे सुजय विखे यांनी निषेध केलेला आहे. न्यायाधीश या प्रकरणात न्याय देतीलच. परंतु इथून पुढे लोणी गाव कोणी वाईट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही सोडणार नाही, असंही शालिनीताई विखे-पाटील म्हणाल्या.