Crime News : मुंबई - नाशिक  महामार्गावर (Mumbai - Nashik Expressway) शहापूर  तालुक्यातील   गोलभण  गावा जवळ  झाडा  लगत   स्कॉर्पिओ  कारमध्ये  मृतदेह  आढळून  आल्यानं  परिसरात  एकच  खळबळ  उडाली  होती.  याप्रकरणी  शहापूर  पोलीस  ठाण्यात  अज्ञात  मारेकऱ्या  विरोधात  हत्येसह  पुरावा  नष्ट  केल्याचा  गुन्हा  दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी  तपास  सुरु  केला.  स्कॉर्पिओ  कारमधील मृतदेह  स्टॉक  ब्रोकर  प्रफुल्ल  पवार  (50)  यांचा असल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यांची आर्थिक वादातून मित्रानंच दोन साथीदारांच्या  मदतीनं हत्या केल्याचा  उलगडा  शहापूर  पोलिसांनी   केला.  संदीप  सरवणकर  (47)  हा  मुंबईत   राहणारा  असून  हत्येचा  मुख्य  आरोपी  आहे.  तर  त्याचे  साथीदार  प्रवीण  शिंदे  (21),   सागर  मराठे  (24)  हे   मूळचे  जळगावचे  आहेत. पोलिसांनी  मुख्य  आरोपीसह  दोघांना अटक  केली  आहे. 


डोक्यात गोळी  घालून हत्या...


पोलिसांनी  दिलेल्या  माहितीनुसार,  4 जुलै रोजी पोलिसांच्या  गस्ती  पथकाला   शहापूर  तालुक्यातील गोलभण   गावाजवळ  असलेल्या   मुंबई-नाशिक  महामार्गावरील   रस्त्याच्या कडेला पार्क   केलेली  स्कॉर्पिओ कार  दिसली. संशय आल्यानं कारची   तपासणी   केली   असता   पोलीस  पथकाला त्या गाडीत    एका   व्यक्तीचा   मृतदेह आढळून आला. त्या व्यक्तीच्या  डोक्याला बंदुकीची गोळी लागली होती.  त्यानंतर   पोलिसांनी   घटनास्थळी पंचनामा   करून   मृतदेह शवविच्छेदनासाठी   शासकीय   रुग्णालयात   पाठवला.  स्कॉर्पिओ  कारमध्ये   मृतदेह   टाकून   अज्ञात  आरोपी   मुंबई -नाशिक  महामार्गच्या  बाजूला  एका   झाडा खाली  उभी  करून  कार   सोडून  पसार   झाले  होते. . 


चेक बुकमुळे  पटली मृतदेहाची ओळख...


दोन  दिवसांपासून   स्कॉर्पिओ  कार  मुंबई  नाशिक  महामार्गा  लगत  उभी  असल्याची   माहिती   पोलिसांना  मिळाली.   पोलिसांकडून  कारची तपासणी करण्या आली.  स्कार्पिओ  कारमध्ये  मृत  प्रफुल   पवार  याच्या  नावानं  चेकबुक  आढळून  आलं  होतं.  पोलिसांनी  त्या  दिशेनं  तपास  सुरु  केला.  मृत  पवार हे वांद्रे परिसरात राहणारे असल्याचं  समोर  आलं. त्यानंतर मृत व्यक्तीच्या पत्नीचा  पोलिसांना शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, मृत प्रफुल्ल  हे  1 जुलै रोजी  घरातून  स्कॉर्पिओ  कारनं  एका  कार्यक्रमासाठी  निघाले  होते.  मात्र  त्यानंतर  त्यांच्याशी कोणताच  संर्पक झाला  नसल्याची  माहिती  पोलिसांना मिळाली. 


मृत व्यक्तीच्या  मोबाईल  कॉल  डेटा  रेकॉर्डमुळे आरोपी  जाळ्यात...


पत्नीनं दिलेल्या माहितीच्या आधारावर तपास करून मृत पवार यांचा  मोबाईल  कॉल  डेटा  रेकॉर्डच्या  आधारे  मुख्य  आरोपी  सरवणकर  याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र  त्यानं  सुरुवातीला  पोलिसांचं  लक्ष  दुसरीकडे  वळवण्याचा  प्रयत्न  केला  होता.  त्यानंतर कसून चौकशीत त्यानंच  मित्रांच्या साथीनं  पवार  यांची  हत्या  केल्याची  कबुली  दिल्याची  माहिती  वरिष्ठ  पोलीस  निरीक्षक  राजकुमार  उपासे  यांनी  दिली  आहे.  


अन् हत्येचा रचला कट... 


पोलिसांनी  दिलेल्या  माहितीनुसार,  मृत  पवार  यांनी  मुख्य  आरोपी  सरवणकर  यांना  5  लाख  रुपये  दिले होते. तेच 5 लाख पवार यांनी परत देण्यासाठी  आरोपी  सरवणकरकडे तगादा लावला होता. मात्र  आर्थिक  अडचणींमुळे आरोपी  सरवणकर  5 लाखांची   परतफेड  करू  शकत  नसल्यामुळं  मृत  पवारांनी  त्याला   शिवीगाळ  केली  आणि काही  लोकांसमोर  त्यांचा  अपमानही  केला. याच गोष्टीचा मनात  राग  धरून  सरवणकरने  आपल्या  साथीदारांसह  हत्येचा  कट  रचला. 


आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी... 


पोलिसांच्या  प्राथमिक  तपासात  आरोपींनी  पवार  यांची 1 जुलै रोजी  मुंबईत  हत्या  केल्याचं  समोर  आलं. तसेच  त्यांचा मृतदेह  त्यांच्या  स्वत: च्या  स्कार्पिओ कारमध्ये टाकला. त्यानंतर  मुंबई - नाशिक महामार्गावर निर्जनस्थळी  कार उभी करून  तिन्ही  आरोपी  फरार झाले.  तिन्ही  अटक  आरोपींना  7 जुलै रोजी न्यायालयात हजर केलं. 5 दिवसांची  पोलीस  कोठडी  सुनावण्यात  आली आहे.