सोलापूर : कमी किमतीत वाहनांची विमा पॉलिसी उतरवण्याचे आमिष दाखवत तब्बल तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सोलापुरात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी देशभरातील विविध राज्यातील सतराशे ग्राहकांची आणि एका विमा कंपनीची तीन कोटी रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. यातील मुख्य आरोपीला सोलापूर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे.


एका विमा कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर विनय रामकृष्ण मंत्री यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून मुख्य आरोपी अजय कोरवार याच्यासह एका साथीदार विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही आरोपींनी 2022 ते 2023 या दरम्यान एका इन्शुरन्स कंपनीचे एजंट असल्याचे अनेकांना भासविले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश, राजस्थानमधील मोटार वाहनधारकांना कमी किमतीचा प्रीमियम देतो असे आमिष दाखवले. चार चाकी गाडी आणि ट्रक सारख्या वाहनाचे बनावट पॉलिसी काढून वाहनधारकांची आणि कंपनीची फसवणूक केली. यात एकूण दोन कोटी 93 लाख 68 हजार 836 रुपयांची फसवणूक झाल्याबाबत फिर्याद देण्यात आली. 


सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल होताच सोलापूर पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. मुख्य आरोपी अजय कोरवार हे कर्नाटकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने लागलीच कर्नाटकात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान मुख्य आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाईल अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिली. 


फसवणूक होतं असल्याचा कंपनीला आला होता अंदाज, आरोपीच्या मागावर होते कंपनीचे पथक


इन्शुरन्स कंपनीच्या फ्रॉड कंट्रोल युनिटला या घटनेची कुणकुण लागली होती. 2022 23 या वर्षांमध्ये एकाच इसमाने अनेक वाहनांची पॉलिसी काढल्याचे कंपनीच्या वेबसाईटवर लक्षात आले होते. कंपनीने या संदर्भात तपास केल्यानंतर या व्यक्तीने दुचाकी वाहनाच्या पॅकेज मध्ये अवजड चार चाकी वाहने, तीन चाकी रिक्षा अशा वाहनांची बनावट पॉलिसी काढल्याचे लक्षात आले. योग्य पॉलिसीनुसार या सतराशे वाहनांच्या पॉलिसीचे रक्कम ही जवळपास तीन कोटी सात लाख 19 हजार रुपये इतकी होते. मात्र आरोपीने दुचाकीची पॉलिसी खरेदी करतं केवळ 13 लाख 50 हजार रुपये भरले. यामुळे कंपनीचे दोन कोटी 93 लाख 68 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हे प्रकार लक्षात आल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून कंपनीचे पथक आरोपींच्या मागावर होते. पथकाला योग्य पुरावे प्राप्त झाल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल केला.