Solapur Crime Sharnu Hande: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे (Sharnu Hande) याला जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या अपहरणामुळे एकच खळबळ उडाली. दिवसाढवळ्या झालेल्या या अपहरणामुळे सोलापूर (Solapur News) जिल्हा अक्षरशः हादरून गेला. ज्यावेळी अपहरणकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी मुख्य आरोपी अमित सुरवसे (Amit Survase) हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा कट्टर समर्थक असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं.
2021 साली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा हाच अमित सुरवसे शरणू हांडे याच्या अपहरणातला प्रमुख आरोपी आहे. पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक का केली, असा जाब विचारत तीन महिन्यापूर्वी शरणू हांडे याने अमित सुरवसे याला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल झाला होता. याचं बदनामीचा बदला घेण्यासाठी अमित याने चक्क शरणू हांडे याचे अपहरण करत हत्येचा कट रचला. पोलिसांची चतुराई आणि अपहरणकर्त्यांमध्येच झालेल्या वादामुळे शरणू याचे प्राण थोडक्यात बचावलेत.
कसा झाला अपहरणाचा प्लॅन?
या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित सुरवसे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी सुडाने पेटला होता. बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने सुरुवातीला पुण्यातून झूम app वरून एक सेल्फ ड्राईव्ह तत्वावर कार भाड्याने घेतली. सोबत सुनील पूजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने, राकेश कुदरे, श्रीकांत सुरपुरे हे मित्र देखील त्याच्या मदतीला होते. पुण्यातून गाडी भाड्याने घेतल्यानंतर हे सगळे आरोपी सोलापुरात पोहोचले. शरणू हांडे हा सोलापुरातील साई नगर भागातल्या राज बियर शॉपीजवळ आल्यानंतर गाडीतून आलेल्या अमित सुरवसे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शरणूवर हल्ला चढवला. घटनास्थळी शंकर बारोळे नावाच्या व्यक्तीने हा सगळा प्रकार पाहिला आणि शरणू याला वाचवण्याचे पहिले प्रयत्न बारोळे यांनी केले. मात्र, आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवल्याने ते मागे हटले आणि आरोपीनी शरणू याला कोयत्याने मारहाण करून चारचाकी गाडीत टाकून त्याचे अपहरण केले.
Sharanu Hande News: शरणू याचा कायमचा बंदोबस्त करण्याचा अमितचा प्लॅन, अपहरणकर्त्यांमध्ये झाला वाद
संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास शरणू हांडे याचे अपहरण केल्यानंतर आरोपी अक्कलकोटच्या दिशेने निघाले. पोलिसांना अपहरणाची बातमी मिळताच शहर पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना देखील घटनेची माहिती दिली. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. मात्र, नाकाबंदीची कुणकुण लागल्याने आरोपीनी गाडी कर्नाटकच्या दिशेने वळवली. कर्नाटकच्या निंबाळ गावात गेल्यानंतर अमित सुरवसे याने शरणू याचा कायमचा बंदोबस्त करायचा, अपमानाचा बदला अपमानाने घेण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण करायचा असा प्लॅन सांगितलं. अमितचा हा प्लॅन ऐकून अपहरणकर्त्यांमध्येच दोन गट पडले. एका गटाने ‘कायमचा बंदोबस्त’ करण्यासाठी विरोध दर्शवला. जवळपास अर्धा तास अपहरणकर्त्यांमध्ये हा वाद सुरूच होता. याचं वादामुळे जो वेळ गेला तीच संधी पोलिसांना अपहरणकर्त्यापर्यंत पोहोचण्यात मदतशीर ठरली आणि शरणूचे प्राण वाचवण्यासाठी पोलिसांना यश आलं.
Solapur Police: घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दाखवली तत्परता
शरणूचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच सोलापूरचे पोलिसांनी आयुक्त एम. राजकुमार यांनी तातडीने उपायुक्त विजय कबाडे आणि उपायुक्त आश्विनी पाटील यांना तपासाचे आदेश दिले. दोन्ही उपायुक्त स्वतः संपूर्ण घटनेची माहिती घेत गांभीर्य ओळखून चार पथक शरणू आणि आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. घटनास्थळावर मिळालेल्या सीसीटीव्हीवरुन गाडी अक्कलकोटच्या दिशेने जातं असल्याने दोन पथक अक्कलकोटच्या दिशेने रवाना करण्यात आले. गाडीची ओळख पटू नये यासाठी आरोपीनी नंबर प्लेटवर चिखल लावला होता. मात्र, सुदैवाने वळसंग येथील टोल नाक्यावर गाडीचा नंबर पोलिसांना मिळाला.
Crime news: सोलापूर शहर पोलिस शाखेच्या विशेष पथकाने चतुराईने वाचले शरणूचे प्राण
गाडीच्या नंबरवरून गाडी झूम अँपवरून भाड्याने घेतल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तातडीने झूम कार कंपनीशी संपर्क करून गाडीचे लोकेशन आणि कोणी भाड्याने घेतली याचे तपशील घेतलं. तेव्हा अमित सुरवसे यानेच गाडी भाड्याने घेतल्याचे पोलिसांच्या समजले. आरोपीची ओळख पटल्याने हा सगळा वाद राजकीय असल्याचे देखील उघड झालं. गाडीची लोकेशन कर्नाटकच्या निंबाळ येथे असल्याचे समोर आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांची दोन पथके कर्नाटकच्या दिशेने तातडीने निघाले. लोकेशनवर पोहोचेपर्यंत वाद करणाऱ्या दोघांना सोडून इतर आरोपी पुढे निघाले होते.
Solapur Crime: शरणूचे प्राण वाचवण्यासाठी असा रंगला थरार
आरोपीची गाडी ही भरधाव असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी देखील तत्परता दाखवत त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. आरोपींची गाडी तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्याचे समजल्यानंतर कार कंपनीला संपर्क करून आरोपींची गाडी रिमोट सिस्टीमने बंद पाडण्यात आली. गाडी बंद पडताच आरोपी गाडीतून उतरले आणि इतक्यात पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचले. पोलीस आल्याचे लक्षात येताच आरोपी अमित सुरवसे याने शरणूला गाडीतून ओढत त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या पथकाने तत्परता दाखवली. आरोपी अमित याला एका पोलिसाने पकडलं तर दुसऱ्याने शरणू याला थोडक्यात वाचवलं. आधीच झालेल्या मारहाणीत जखमी आणि रक्तबंबाळ असलेल्या शरणूला पोलिसांनी तात्काळ हॉस्पिटलला नेलं. तर आरोपीला दुसऱ्या पथकाने ताब्यात घेतलं.
शरणू हांडे याचे प्राण वाचवण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, वपोनि प्रमोद वाघमारे, वपोनि सुनील दोरगे, पोनि विजय खोमणे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि भरत चंदनशिव, सपोनि शंकर धायगुडे, पोउपनि महेंद्र गाढवे, पोहेकॉ सचिन भांगे, पोना मंगेश गायकवाड, पोलीस अंमलदार शैलेश स्वामी, अमोल यादव, अमसिध्द निंबाळ, सुहास अर्जुन, शंकर याळगी, कुमार बोल्ली, अमर शिवसिंगवाले, किशोर व्हनगुंटी, अविनाश डिगोळे, सकलेन मुकादम, तसेच गुन्हे शाखेकडील अंकुश भोसले, शैलेश बुगड, काशिनाथ वाघे, अभिजीत धायगुडे, राजकुमार वाघमारे यांनी अथक परिश्रम घेतले.
आणखी वाचा