Sharad Pawar :मराठी भाषेच्या मुद्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. परिणामी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढतील, अशा दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडियात कुणाला आक्षेप नाही, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान याच दाव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या दाव्यावर स्पष्टीकरण देत प्रतिक्रिया दिली आहे.
महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीबाबत आम्ही अजून चर्चा केलेली नाही. आणि त्यामुळे एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्या संबंधी मी भाष्य करु शकत नाही. आम्ही एकत्र बसून चर्चा करुन एकमत करता येईल का? हे फायनल करणार, असे शरद पवार म्हणाले आहेत. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत- संजय राऊत
आम्ही सगळ्यांशी चर्चा करत आहोत. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि आघाडी लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप कोणती आघाडी तयार झाली असेल तर मला सांगा. तुम्ही आतापर्यंत इतिहसात प्रत्येक महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाडी निर्माण होत असतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यात राजकीय पक्ष सुद्धा नसतात. त्याच्यामुळे त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या पक्षातील प्रमुख कार्यकर्ते आणि त्यांना असतात. मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबई बाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत. आहेत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे,
मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई वाचण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र ठरवलं असेल तर मराठी जनतेला, स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंद असेल. राज ठाकरे यांनी परप्रांतीच्या विरोधात कोणती भूमिका घेतली नाही. कधीकाळी शिवसेनेवरती आरोप होत होते महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आलं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशा प्रकारचे आंदोलन सध्या बंगालमध्ये सुरू आहे. ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाषा आंदोलन सुरू केलं. तामिळनाडूमध्ये तेच आंदोलन सुरू आहे. तुम्ही महाराष्ट्रावर का आक्षेप घेत आहात? आम्ही मराठी बोलतो म्हणून आणि मराठी बोला असं सांगत आहोत म्हणून, मराठी बोलणार नाही असं जेव्हा सांगितलं जातं महाराष्ट्रात तेव्हा त्यांच्याविरुद्ध लोकांचा रागाचा भडका उडतो आणि तो स्वाभाविक आहे. असेही संजय राऊत म्हणाले.
आणखी वाचा