Solapur Crime : सोलापुरातील (Solapur) तरुणाला एका टोळक्याकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. 'लव्ह जिहाद'चा (Love Jihad) संशय घेऊन टोळीने मारहाण केल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला आहे. या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. मुजाहिद पठाण असे जखमी तरुणाचे नाव आहे. 1 मार्च रोजी हा सगळा प्रकार घडला असून यासंदर्भात सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.


काय आहे प्रकरण?


मुजाहिद पठाण आणि तरुणी एकाच कार्यालयात नोकरी करतात. मागील 10 ते 12 वर्षांपासून त्यांची ओळख आहे. 1 तारखेला हे दोघे ही शहरातील एका आईस्क्रीम दुकानात बोलत बसले होते. यावेळी तरुणांचा एक गट तिथे आला. तू मुस्लीम असताना हिंदू मुलीसोबत काय करतोय असा सवाल करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. टोळक्याने केलेल्या मारहाणीत तरुणाला छातीवर इजा झाली. बरगड्यांना मुका मार लागल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. 


पीडित तरुण आणि तरुणीकडून पोलिसात तक्रार


या हल्ल्यानंतर जखमी तरुणाने पीडित तरुणीसह सदर बझार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार अर्ज दिला. दरम्यान या प्रकरणी जखमी तरुण आणि पीडित तरुणीचे अर्ज स्वीकारले असून कायदा हातात घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी दिली.


राज्य सरकार लव्ह जिहाद कायदा आणणार?


पालघरमधील श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणानंतर (Shraddha Walkar Murder Case) राज्य सरकार उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या प्रयत्नात आहे. हा कायदा मंजूर झाल्या महाराष्ट्रातील लव्ह जिहादच्या प्रकरणं रोखण्यास आणि त्यावर प्रतिबंध घालण्यास मदत होईल, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. तर लव्ह जिहाद कायद्याबाबत आम्ही पडताळणी करत आहोत, कुठलाही निर्णय घेतलेला नाही. परंतु वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे केले आहेत याचा अभ्यास या निमित्ताने करणार आहोत," अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.


अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरुन अल्पवयीन पीडित मुलीवर जीवघेणा हल्ला


दरम्यान, सोलापुरात गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरुन अल्पवयीन पीडित मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे. आरोपींनी पीडित मुलीवर सत्तूर आणि कोयत्याने वार केले. या हल्ल्यात या नराधमांनी मुलीची दोन बोटं छाटल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय माने आणि नामदेव दळवी अशी आरोपींची नावं आहे. या दोघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.