Forensics Expert on Shraddha Murder Case : क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या दिल्लीतील श्रद्श्रा वालकर हत्याकांडामुळे ( Shraddha Murder Case ) संपूर्ण देश हादरला आहे. प्रेयसीची कत्तल करुन तिच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे करत आरोपीनं त्याची विल्हेवाट लावली. मे महिन्यामध्ये घडलेलं हे हत्याकांड आता समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आरोपी आफताबने प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या केल्याची कबूली दिली आहे. मात्र हत्येला अनेक महिने उलटून गेल्यामुळे पोलीस आणि फॉरेन्सिक तपासावर सर्व प्रकरण अबलंबून आहे.
श्रद्धाची हत्या होऊन सुमारे सहा महिने उलटले
श्रद्धाची हत्या होऊन सुमारे सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात फॉरेन्सिकची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. फॉरेन्सिक टीमकडून रक्त पेशी, हाडे यांच्या आधारे पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे सापडल्याचं समोर आलं आहे. हात आणि कमरेची काही हाडं सापडल्याचं मीडिया रिपोर्टमध्य म्हटलं जात आहे. हत्या होऊन अनेक महिने उलटल्याने मृतदेहाचे तुकडे कुजलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे आफताब विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना फॉरेन्सिकवर अवलंबून राहावं लागणार आहे.
'गुन्हेगार सर्व पुरावे नष्ट करु शकत नाहीत'
फॉरेन्सिक एक्सपर्ट इंद्रजित राय यांनी या प्रकरणातील दिल्ली पोलिसांचा तपास आणि यामध्ये फॉरेन्सिकची मदत कशी महत्त्वाची ठरेल, याबाबत सांगितलं आहे. इंद्रजित राय यांनी सांगितलं आहे की, गुन्हेगार सर्व पुरावे नष्ट करु शकत नाहीत. फॉरेन्सिक टीमसमोर पुरावे गोळा करण्याचं आव्हान आहे. फॉरेन्सिक टीमकडून क्राईम स्पॉट, रक्त पेशी, डीएनए, थुंकी, ब्लड स्टेन, जंगल आणि आफताबच्या घरात सापडलेली माती. फ्रीजमधील नमुने यांच्या आधारावर तपास सुरु आहे.
तपास करताना फॉरेन्सिक टीमचा कस लागणार
या प्रकरणाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागल्याने त्याचा योग्य प्रकारे तपास करण्याचा दबाव फॉरेन्सिक टीमवर आहे. त्यामुळे इतर देशातील बेस्ट टेक्निक आणि फॅसिलिटीची मदत घेतली जाऊ शकते. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाचा वेगानं तपास सुरु आहे. पोलिसांनी आरोपी आफताबला सोबत घेऊन दिल्लीतील मैहरोलीच्या जंगलात तपास सुरु आहे. आफताबने याच जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकल्याचं सांगितलं, त्यामुळे पोलिसांकडून त्याला जंगलात नेत तपास सुरु आहे.
मे महिन्यामध्ये आफताबने या हत्याकांडाचा घाट रचला आणि त्यानंतर श्रद्धाचं इंस्टाग्राम अकाऊंट वापरून तिच्या मित्रांसोबत संवाद साधत श्रद्धा जिवंत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. श्रद्धासोबत अनेक महिने संपर्क न झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी श्रद्धाच्या मित्रमंडळीकडे विचारणा केली. यानंतरही श्रद्धाचा पत्ता न लागल्याने तिचे कुटंबिय मुंबईतून दिल्लीला पोहोचले, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.