Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर मर्डर केसनं अवघा देश हादरलाय. देशाला हादरणाऱ्या या मर्डर मिस्ट्रीबाबत आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. पण तो एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर त्यानं मतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले, ते फ्रिजमध्ये स्टोअर केलं. त्यानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरात जाऊन ठराविक अंतरानं टाकून दिले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनाचा उलगडा आता झाला तेव्हा या घटनेतलं कौर्यही समोर आलं. दोघेही मूळचे वसईतलेच होते. श्रद्धाच्या या प्रेमप्रकरणाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. पण हा विरोध झुगारून ती आफताब सोबत लिव्ह इन रिलॅशनशिपमध्ये राहत होती. तिने आफताबकडे लग्नासाठी तगादा लावल्यानं त्यानं तिची हत्या केल्याचं समोर आलंय. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. तसेच, पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 


आफताब अमीन पूनावाला याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही अत्याचारी घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत. सध्या पोलीस हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेत आहेत. विश्वासघात आणि फसवणुकीच्या या संतापजनक घटनेत आरोपी आफताब गुन्हा केल्यानंतर सहा महिने फरार होता. चौकशीत त्यानं पोलिसांना सांगितलं की, श्रद्धाचा खून केल्यानंतर तो त्याच घरात राहत होता. त्याच्या चौकशीत हत्येचा तपशील समोर आल्यानंतर शनिवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली.


आधी प्रेम, मग हत्या; पण का? 


आफताब पूनावालानं पोलिसांना तपासादरम्यान सांगितलं की, "हत्येपूर्वी काही दिवस श्रद्धानं आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. वैतागल्यामुळे रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. अमेरिकन टेलिव्हिजन मालिका 'डेक्स्टर' मधून श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचली. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी आरोपीनं 300 लिटरचा फ्रीज विकत घेतला. तसेच, घरातील मृतदेहाचा गंध लपवण्यासाठी तो अगरबत्ती आणि रुम फ्रेशनरचा वापर करत होता. मध्यरात्री दोन वाजता आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी घराबाहेर पडायचा आणि दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत ते फेकून द्यायचा. हे करताना तो आवर्जुन एका गोष्टीकडे लक्ष द्यायचा की, कोणता तुकडा सडतोय, हे पाहुनच तो कोणता तुकडा फेकून द्यायचा हे ठरवायचा. 


श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फिजमध्ये, पण त्याच घरात आफताब दुसऱ्या महिलेसोबत 


इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आफताबनं दुसऱ्या एका तरुणीला घरी डेटसाठी बोलावलं होतं. त्यावेळी त्याच घरातील फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या मृत्यूनंतर आफताब एका डेटिंग अॅपद्वारे दुसऱ्या एका तरुणीच्या संपर्कात आला होता. महत्त्वाचं म्हणजे, याच डेटिंग अॅपद्वारे 2019 मध्ये श्रद्धा आणि आफताबची भेट झाली होती. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जून-जुलैमध्ये दुसरी तरुणी एक-दोनदा त्याच्या घरी आली होती. त्यावेळी आफताबनं श्रद्धा वालकरच्या शरीराचे अवयव फ्रीज आणि किचनमध्ये लपवून ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. 18 मे रोजी श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आफताबनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉगइन केलं आणि तिच्या मित्रांना ती हयात असल्याचं भासवलं. एवढंच नाहीतर, कोणीही तिच्या मुंबईच्या पत्त्यावर संपर्क साधू नये म्हणून आफताबनं तिच्या क्रेडिट कार्डाची बिलंही भरली. 


सोशल मीडियावर श्रद्धाच्या मित्रांशी साधला संवाद


हत्येनंतर पुढील काही आठवडे, आफताबनं संशय निर्माण होऊ नये म्हणून तिचे सोशल मीडिया अकाउंट वापरून श्रद्धाच्या मित्रांशी संवाद साधला. कुटुंबीयांनी त्यांच्या नात्यावर आक्षेप घेतल्यानं श्रद्धा आणि त्यांच्यात कोणताही संवाद होत नव्हता. गेल्या दोन महिन्यांपासून श्रद्धाचा फोन येत नसल्याचं त्यांच्या एका मित्रानं सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी सप्टेंबरमध्ये मुंबईत तक्रार नोंदवली. 


वडिलांची तक्रार, नंतर आफताबला दिल्लीत अटक


श्रद्धाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर, मुंबई पोलिसांनी दिल्लीतील त्याचे शेवटचे लोकेशन शोधून काढले आणि त्याला समन्स बजावलं. त्याच्या चौकशीतून अनेक संशयास्पद बाबींचा खुलासा झाल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, "मुंबई पोलिसांनी आफताब आणि श्रद्धाचे कॉल डिटेल्सचे रेकॉर्ड्स (CDR) मिळवले. त्यावेळी तिचा मोबाइल मे महिन्यापासून बंद असल्याचं आढळलं. त्यानंतर आम्ही आफताबला फोन करून त्याची चौकशी केली आणि त्याचा जबाब नोंदवला." 8 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी श्रद्धा बेपत्ता झाल्याची माहिती दिल्लीतील मेहरौली पोलीस ठाण्यात दिली होती. तपासादरम्यान, आफताबच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Shraddha Murder Case: मुंबईत प्रेम दिल्लीत गेम; प्रेयसीच्या मृतदेहाचे केले 35 तुकडे, 18 दिवस आफताबने या तुकड्यांचं काय केलं?