Shraddha Murder Case: वसईत डेटिंग अँपवरुन झालेली मैत्री आणि मैत्रीतून झालेलं प्रेमाच्या रूपांतरनंतर थेट दिल्लीत घडलेल्या क्रूर हत्याकांडात झाले आहे. यामुळे दिल्लीसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. दिल्लीत हत्या झालेली तरुणी आणि तरुण हे वसईतील राहणारे असल्याची माहिती मिळाली आहे. तरुणीच्या मित्राने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि वसईच्या माणिकपूर पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे हत्याकांडाचे संपूर्ण प्रकरण उघड झालं. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर ही वसईच्या संस्कृती सोसायटीत आपले वडिल, आई आणि भावासोबत राहत होती. श्रद्धा 2019 मध्ये मालाडच्या एका कॉलसेंटरमध्ये काम करत होती. तेव्हा वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावाला या तरुणाशी एका डेटिंग अँपवरुन मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचे रुपातंर प्रेमात झालं. ऑक्टोंबर 2019 रोजी श्रद्धाने आपल्या घरच्यांना आफताबच्या प्रेम संबंधाबाबत सांगितलं. मात्र या प्रेम संबंधाबाबत घरच्यांनी विरोध केला. यानंतर श्रद्धा ऑक्टोंबरमध्येच आफताब बरोबर वसईच्या नायगांव येथे एका भाड्याच्या घरात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागली.
जानेवारी 2020 साली कोविडमुळे श्रद्धाच्या आईचा मृत्यू झाला. त्यावेळी 15 दिवसासाठी श्रद्धा घरी आली होती. त्यानंतर ती पुन्हा आफताब बरोबर राहायाला गेली. दोन वर्ष नायगांव येथे राहिल्यानंतर दोघेही मार्च 2022 मध्ये दिल्ली येथे शिफ्ट झाले. यादरम्यान श्रद्धा तिचा कॉलेजचा मित्र लक्ष्मण नाडर याच्याशी संपर्कात होती. आफताब आपल्याला खुप त्रास देत असल्याचं ती त्याला सांगत होती. मात्र अचानकपणे मे महिन्यापासून श्रद्धाचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे श्रद्धाचा मित्र लक्ष्मणला याचा संशय आला. त्याने याबाबत वसई पोलीस ठाण्यात 6 ऑक्टोंबर 2022 रोजी श्रद्धाशी संपर्क होत नसल्याबाबतचा तक्रार अर्ज केला होता. वसई पोलिसांनी तो अर्ज माणिकपूर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला. माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस संपतराव पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचीन सानप यांना ही यात संशय आल्याने त्यांनी श्रद्धाच्या वडिलांना गाठून श्रद्धाची मिसिंग तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल करुन घेतली. यानंतर तपास सुरु केला. मधल्या काळात आफताबचीही चौकशी केली असता आफताबने मे महिन्यात श्रद्धाने त्याच्याशी भांडण करुन, निघून गेल्याच सांगितलं. ती आता कुठे आहे हे माहित नसल्याचं त्याने पोलिसांना सांगतिलं. आफताबच्या या सांगण्यावरुन पोलिसांचा संशय अजून वाढला. मात्र मिसिंगची घटना दिल्लीतील मेहरावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने अधिक तपासासाठी माणिकपूर पोलिसांनी शेवटी दिल्ली गाठली. 9 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्लीच्या छात्रपूरा येथील मेहरावली पोलीस ठाण्यात श्रद्धाची मिसिंग केस दाखल केली. माणिकपूर पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या एकूण तपासातून आफताबच्या या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.
आफताबने मेहरावली पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाने तगादा लावल्यामुळे आपण कंटाळून तिची हत्या केल्याची कबूली दिली आहे. तसेच तिचे 35 तुकडे करुन, दिल्लीच्या परिसरात फेकल्याची माहिती त्याने दिली आहे. आता यासर्व घटनेचा दिल्ली पोलीस तपास करत आहेत. मात्र प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, आफताब हा कॉलसेंटरमध्ये काम करण्याअगोदर मुंबई येथे एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ होता. त्यामुळे त्याला मांसाचे तुकडे कसे करायचे याबाबत माहित आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने 300 लिटरचा फ्रिज घेतला होता. त्यात त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे 15 दिवस ठेवले होते. प्रत्येक दिवशी एक दोन तुकडे तो दिल्लीच्या परिसरात फेकत होता. 16 मे रोजी त्यांचा लिव्ह इन रिलेशनशीपच्या दिवसाचा वाढदिवस होता. तो दोघांनी साजरा ही केला. त्यानंतर दोन दिवसानंतर 19 मे रोजी श्रद्धाची हत्या आफताबने केल्याच समोर आलं आहे.