Suyash Tilak: अभिनेता जितेंद्र जोशीचा (Jitendra Joshi) गोदावरी (Godavari) हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. सध्या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी बरोबरच अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोने, अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. नुकतीच अभिनेता सुयश टिळकनं (Suyash Tilak) गोदावरी या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
सुयशनं चित्रपटाचं केलं कौतुक
सुयशनं पत्नी आयुषी टिळक आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला सुयशनं खास कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये सुयशनं लिहिलं, '“गोदावरी” साध्या माणसांची साधी सरळ गोष्ट. प्रवाहाबरोबर वाहताना आपण स्वतःला काही वेळा हरवून बसतो, प्रेम देणाऱ्यांना दुरावून बसतो फार उशीर झालाय हे जाणवायच्या आत त्याची जाणीव झाली तर ठीक नाहीतर ही परंपरा चालू राहतेच…'
मराठी चित्रपटांबाबत देखील सुयशनं पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'आता मराठी सिनेमे चालवायचे की नाही हे प्रेक्षकांच्या हातात आहे. अलिकडच्या काळात “कशाला चित्रपटगृहात जायचं OTT वर आलं की बघू” अशी रड फक्त मराठी चित्रपटांबाबतीत जास्त ऐकायला/बघायला मिळते. त्याने मराठी सिनेमे आपल्या महाराष्ट्रातच कमी चालतात. काही सिनेमे अपवाद पण ह्यामुळे अलिकडच्या काळात आलेले अनेक दर्जेदार मराठी सिनेमे दुर्दैवाने चित्रपटगृहात फार काळ टिकले नाहीत,ह्याचं दुःख वाटतं. महाराष्ट्रातच मराठी सिनेमे नाही चालले किंवा प्रेक्षकांनी ते हट्टानी नाही चालवले तर काय करणार? पण अश्या निर्मात्यांमुळे व अश्या चित्रपटांमुळे चांगलं काम करता येईल व बघता येईल अशी आशा वाटत राहते.'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Godavari Movie: 'नदीसाठी, नदीकाठी!'; गोदावरी चित्रपटाच्या टीमनं केली ‘गोदावरी’ नदीची आरती