Shraddha Murder Case: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात (Shraddha Walkar Case) मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी आफताब पुनावालाने (Aftab Poonawala) जंगलात फेकलेल्या हाडांचा डीएनए हा श्रद्धा वालकरच्या वडिलांशी जुळला आहे. त्यामुळे आफताबने फेकलेली हाडे श्रद्धाची असल्याचे समोर आले आहे. फॉरेन्सिक अहवालात समोर आलेल्या या गोष्टीमुळे श्रद्धा हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
दिल्ली पोलिसांनी महरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून काही हाडे हस्तगत केली होती. त्याशिवाय, आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर राहत असलेल्या घरातून काही पुरावे दिल्ली पोलिसांनी जमा केले होते. यामध्ये घरात आढळलेल्या रक्ताच्या डागाचे नमुने घेतले होते. हे सगळे पुरावे न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. जंगलात सापडलेली हाडे ही आरोपी आफताब पुनावालाने दिलेल्या माहितीनंतर जप्त करण्यात आली होती.
आरोपी आफताबकडून पोलीस चौकशीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आफताबविरोधात पुरावे जमा करण्याचे मोठे आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे. दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए सॅम्पल घेतले होते. दिल्लीतील जंगलात आढळलेली हाडे आणि श्रद्धाच्या वडिलांचा डीएनए जुळला असून ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मूळचे वसई येथील असलेले श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कुटुंबीयांचा विरोध असल्याने हे दोघेही दिल्लीत स्थायिक झाले होते. मात्र, काही महिन्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. त्यानंतर आफताबने मे महिन्यात श्रद्धाची हत्या करत तिच्या शरिराचे तुकडे केले.
दोन महिने झाले तरी श्रद्धाने कोणताही थेट संपर्क साधला नसल्याने तिच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात तिची हत्या झाली असल्याचे समोर आले.
पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, आफताब आणि श्रद्धा यांच्यात सातत्याने भांडणे, वादविवाद होत असे. आफताबने अनेकदा श्रद्धाला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर काही वेळेस श्रद्धाने आफताबचे घर सोडले होते. मात्र, आफताबने माफी मागत तिला घरी नेले होते. मात्र, आफताबवर विश्वास दाखवणे हे श्रद्धाच्या जीवावर बेतले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: