Tata Bisleri Deal:  मागील तीन दशकांपासून अधिक काळ मिनरल वॉटरच्या बाजारपेठेत वर्चस्व असणारी बिस्लेरी कंपनी (Bisleri) ही आता 'टाटा' समूहाच्या (Tata Group) मालकीची होण्याची शक्यता आहे. टाटा समूह बिस्लेरी कंपनी सहा ते सात हजार कोटींना खरेदी करण्याची शक्यता आहे. लवकरच हा करार पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. 


'बिझनेस टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा समूहातील 'टाटा कंझ्युमर प्रोडक्टस लिमिटेड' (TCPL) बिस्लेरी खरेदी करणार आहे. हा करार झाल्यानंतरही विद्यमान संचालक मंडळाकडून कंपनीने व्यवस्थापन पाहिले जाणार आहे. बिस्लेरी कंपनीचे भारतासह इतर देशांमधील मिनरल वॉटरच्या बाजारपेठेवर मोठे वर्चस्व आहे. 


बिस्लेरी कंपनीची विक्री का?


या कराराबाबत माहिती देताना 'इकॉनॉमिक टाइम्स'ने म्हटले की, उद्योजक रमेश चौहान हे सध्या 82 वर्षांचे झाले आहेत. मागील काही दिवसांपासून वयोमानामुळे प्रकृती बरी नसते. त्याशिवाय, बिस्लेरी कंपनीला भविष्यात पुढे नेण्यासाठी, व्यवसाय विस्तारासाठी उत्तराधिकारीदेखील नाही. त्यांची कन्या जयंती या  व्यवसायाबाबत फारशा व्यवसायाबाबत उत्सुक नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बिस्लेरी कंपनी विक्री करण्यात येणार आहे. रमेश चौहान यांनी एका मुलाखतीत टाटासह इतर काही कंपन्या बिस्लेरी खरेदी करण्यासाठी चर्चा करत असल्याचे म्हटले होते. 


टाटांनी दिला होता प्रस्ताव


टाटा ग्रुपने बिस्लेरी इंटरनॅशनल कंपनीमध्य हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी प्रस्ताव दिल्याचे वृत्त होते. टाटा समूह बाटली बंद पिण्याच्या पाणीच्या व्यवसायावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. टाटा समूहाने बिस्लेरी समूहात निर्णायक हिस्सा खरेदी करण्याचा करार पूर्ण केल्यास, बाटलीबंद मिनरल वॉटर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी होईल. 


देशातील बाजारपेठेवर बिस्लेरीचे वर्चस्व 


देशात बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची बाजारपेठ ही जवळपास 20 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. त्यातील 60 टक्के भाग हा असंघटित आहे. संघटीत बाजारात बिस्लेरीचा वाटा जवळपास 32 टक्के इतका आहे. देशभरात बिस्लेरीचे 122 हून अधिक ऑपरेशनल प्लांट आहेत. संपूर्ण देशभरात 5000 ट्रकसह 4500 हून अधिक डिस्ट्रीब्यूटर नेटवर्क आहे.


याआधी शीतपेयांची विक्री 


बिस्लेरी कंपनीने आपल्या सुरुवातीच्या काळात शीतपेयांचे उत्पादन केले होते. बिस्लेरी कंपनीकडे थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का कंपनीचे उत्पादन कंपनीकडून करण्यात येत होते. मात्र, कोका-कोला कंपनींला या ब्रॅण्डची विक्री करण्यात आली. त्यानंतर काही वर्षांपूर्वीं शीतपेयांच्या नव्या ब्रॅण्डसह बिस्लेरी बाजारपेठेत उतरली. 


टाटा कंझ्युमरकडे कोणत्या ब्रॅण्डची मालकी 


टाटा कंझ्युमर कंपनी स्टारबक्स कॅफे चालवण्यात येते. त्याशिवाय, टेटली चहा, Eight O' Clock coffee, सोलफूल सिरियल्स, मीठ, डाळीशी निगडीत ब्रँडची मालकी टाटा कंझ्युमरकडे आहे. बिस्लेरी कंपनी अधिग्रहित केल्यानंतर टाटाकडून व्यवसायाचा अधिक विस्तार करण्याबाबत धोरण निश्चित केले जात आहे. बिस्लेरी खरेदी केल्यानंतर टाटा ग्रुपला रिटेल स्टोर्स, केमिस्ट चॅनल्स, इन्स्टिट्यूशनल चॅनल्स, हॉटेल्ससह रेडी गो-टू-मार्केट नेटवर्क मिळणार आहे.