Sheena Bora मुंबई : एकेकाळी प्रचंड गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडात प्रकरणाबाबत (Sheena Bora Murder case) ज एक नवी माहिती समोर आली असून इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जीने सीबीआयच्या आरोपपत्रावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. सीबीआयच्या आरोपपत्रातील आपले जबाब खोटे आणि काल्पनिक असल्याचा विधीचा दावा आहे. मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयात विधी मुखर्जीने सीबीआयच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
दरम्यान, जबरदस्ती कोऱ्या कागदावर आणि ई-मेलच्या कॉपींवर सह्या करून घेतल्याचा विधी मुखर्जीने कोर्टात दावा केला आहे. हीच कागदपत्रेनंतर जबाब म्हणून सीबीआयने सादर केली असल्याचे विधी मुखर्जीचं म्हणणं आहे. अशाप्रकारे तिच्या नावे खोटे जबाब आरोपपत्रात घालणं, म्हणजे कोणालातरी खोटं फसवण्याचा डाव असल्याचा आरोपही विधी मुखर्जीने केला आहे. तर आई इंद्राणी मुखर्जीला अडकवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचाही विधी मुखर्जीने आरोप केला आहे. तर आईच्या अटकेनंतर विधीचे कोट्यावधी रुपयांचे दागिने आणि बँकेतील सात कोटी रुपये चोरी झाल्याचा खळबळजनक आरोप विधीने केला आहे. तसेच शीना स्वतःला इंद्राणीची बहीण म्हणून दाखवत असल्याचा देखील विधी मुखर्जीचे म्हणणे आहे. इंद्राणी मुखर्जीवर आपली मुलगी शिना बोराची हत्या केल्याचा आरोप असून सध्या इंद्राणी मुखर्जी जामीनावर बाहेर आहे.
काय आहे शीना बोरा हत्याप्रकरण?
शीना बोरा हत्याप्रकरण प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. 24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणी मुखर्जीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आले होते.
इंद्राणीने मुंबईतील वांद्रे येथे शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पेण परिसरातील गागोदे गाव गाठलं होतं. या गावाच्या परिसरात शीनाचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.
आणखी वाचा