Shraddha Murder Case: देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walker Murder Case) हत्याकांडात दिवसागणिक नवीन गोष्टी बाहेर येत आहेत. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये पालघरला राहत असताना श्रद्धाने आफताब विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. आफताब हा गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार तिने केली होती. मात्र, काही दिवसातच तिने ही तक्रार मागे घेतली. पोलिसांनी या तक्रारीवर कारवाई केली असती तर हा चित्र वेगळे असते अशी चर्चा सुरू झाली आहे.
आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर हे पालघरमध्ये वास्तव्य करत होते. या दरम्यान, कॉलसेंटरमध्ये काम करत असताना दोघांमध्ये प्रेम जुळले. त्यानंतर त्यांनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. काही काळ पालघर जिल्ह्यात राहिल्यानंतर ते दोघेही दिल्लीला स्थायिक झाले होते. मात्र, पालघर जिल्ह्यात असतानाच दोघांमधील संबंध बिघडले असल्याचे म्हटले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. आफताब हा गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा पूर्वमधील तुळींज पोलीस ठाण्यात (Nalasopara Tulinj Police Station) केली होती. श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 मध्ये ही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 19 डिसेंबर 2020 रोजी तिने ही तक्रार मागे घेतली असल्याचेही समोर आले आहे.
श्रद्धा वालकर हिने 2020 मध्ये आफताब आपला गळा दाबत असल्याची तक्रार केली होती. तर तुळींज पोलिसांनी याबाबत कारवाई का केली नाही, तिने तक्रार मागे घेईपर्यंत पोलिसांनी वाट पाहिली, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान,
श्रद्धाच्या तक्रारीची माहिती देण्यास तुळींज पोलिसांनी टाळाटाळ केली असून ही माहिती तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपी आफताबची नार्को चाचणी होणार
श्रद्धा हत्याकांडात प्रकरण एक कोडे बनत चालले आहे. आरोपी आफताबकडून पोलिसांकडून सतत दिशाभूल करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी दिल्लीच्या साकेत कोर्टाकडे नार्को टेस्टची मागणी केली होती, त्याला परवानगी देण्यात आली आहे. आफताबने नार्को टेस्टच्या माध्यमातून महत्त्वाच्या गोष्टी उघड कराव्यात, जेणेकरून हत्येचे गूढ उकलता येईल, असे पोलिसांना अधिकाऱ्यांना वाटते.
नार्को चाचणीतून काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. मात्र, या चाचणीतून धक्कादायक खुलासे होतील अशी शक्यता कमी असते. नार्को चाचणीच्या अहवालालाही न्यायालय पुरावा मानत नाही. मात्र, ज्या प्रकरणांमध्ये पुरावे मिळत नाही, आरोपी पोलिसांची दिशाभूल करतात, त्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून नार्को चाचणीद्वारे महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो.